छत्रपती संभाजीनगरप्रशासनमहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर विभागात मसाल्यांचा ६ कोटी ४२ लाखांचा साठा जप्त; २७ परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; ९६ आस्थापनांची तपासणी, ४७ सुधारणा नोटिसा

B1न्यूज मराठी नेटवर्क500

छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासनाने मसाले व मसालेजन्य पदार्थांच्या तपासणी मोहिमेत छत्रपती संभाजीनगर विभागात ६ कोटी ४२ लाख ७७ हजार रुपये किमतीचा २ हजार ५१७.२७ क्विंटल साठा जप्त केला आहे. दिनांक १ एप्रिल ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विभागातील ९६ आस्थापनांची तपासणी करून ४७ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, २७ अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जप्त साठ्याचे मूल्य व निलंबित परवान्यांच्या संख्येत छत्रपती संभाजीनगर विभागातील कारवाई राज्यात सर्वाधिक असल्याचे प्रशासनाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ग्राहकांपर्यंत भेसळयुक्त, अप्रमाणित अथवा असुरक्षित मसाले पोहोचू नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान अस्वच्छता व स्वच्छताविषयक अनुसूची चारमधील तरतुदींचे उल्लंघन आढळलेल्या आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

निलंबनाच्या कालावधीत संबंधित आस्थापनांना निलंबित परवान्याअंतर्गत अन्न व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच जप्त साठ्याची विक्री, वाहतूक, हस्तांतरण, पुनर्पॅकिंग व लेबल बदलण्यास प्रतिबंध आहे. सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वलेखी निर्देशाशिवाय या साठ्याची विल्हेवाट लावता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.500मसाले व मसालेजन्य पदार्थांबाबत दिनांक १५ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अनुपालन आदेशानुसार, २३ ते २९ ऑक्टोबरदरम्यान उत्पादक, घाऊक विक्रेते, वितरक व किरकोळ विक्रेत्यांच्या आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम राज्यभर राबविण्यात आली. राज्यात १ एप्रिलपासून एकूण १ हजार ५७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, सुमारे १९ कोटी ७० लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

अन्न व्यवसाय चालकांनी कच्च्या मालाच्या मूळ स्रोताची नोंद ठेवावी, खरेदी-विक्रीचे संपूर्ण अभिलेख जतन करावेत व योग्य लेबलसह पॅकबंद स्वरूपात विक्री करावी. अन्नसुरक्षाविषयक नियम व प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करावे. भेसळयुक्त, अप्रमाणित अथवा असुरक्षित मसाल्यांचे उत्पादन, साठवणूक किंवा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांनी मसाले व मसालेजन्य पदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत. सुटे व विनालेबल मसाले खरेदी करणे टाळावे. खरेदीपूर्वी लेबल, बॅच क्रमांक, पॅकिंग दिनांक व वापराच्या योग्य कालावधीचा तपशील तपासावा. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा संशयास्पद विक्रीबाबत तक्रार असल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर अथवा अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रार निवारण पोर्टलवर नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button