श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंची आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, नातेपुते येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीच्या कुस्तीपटूंनी नेत्रदीपक कामगिरी करत पदकांची लयलूट केली. विविध वजन गटांत खेळाडूंनी मिळविलेल्या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.
या स्पर्धेतील ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात वैभव धस याने ८७ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. याच वजन गटात ओंकार देशमुख याने तृतीय क्रमांक मिळविला, तर ८२ किलो वजन गटात करण ढाणे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर ६३ किलो वजन गटात सागर खराडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
फ्रीस्टाइल महिला कुस्ती प्रकारात ५९ किलो वजन गटात आश्लेषा बगाडे हिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. फ्रीस्टाइल पुरुष कुस्ती प्रकारात ५७ किलो वजन गटात रोहित पाटील याने सुवर्णपदक पटकावले, तर ७० किलो वजन गटात शुभम ढोणे याने द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.
खेळाडूंनी संपादन केलेल्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारिणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संतोष कवडे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
या यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हरिदास बारसकर, डॉ. विजयानंद निंबाळकर व डॉ. रामहरी नागटिळक यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंनी मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेचा पुन्हा एकदा गौरव झाला आहे.




