शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २६ वे देहदान ; निवृत्त शिक्षिका मीनाक्षी तुपे यांनी मृत्यूनंतरही जपला ज्ञानदानाचा वसा

B1न्यूज मराठी नेटवर्क
रत्नागिरी, दि. २९ : आयुष्यभर शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे संस्कार देणाऱ्या एका शिक्षिकेने मृत्यूनंतरही आपली शैक्षणिक बांधिलकी जपत समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे. हनुमान सोसायटी, उत्कर्ष नगर येथील रहिवासी व निवृत्त प्राथमिक शिक्षिका मीनाक्षी पद्माकर तुपे (वय ७८ वर्षे) यांनी मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान करून दातृत्वाचा एक अनमोल संदेश दिला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हे २६ वे देहदान अत्यंत आदरपूर्वक वातावरणात संपन्न झाले. दिवंगत मीनाक्षी तुपे यांचे बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी चिंतामणी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. हयात असतानाच त्यांनी, ‘आपल्या शरीराचा उपयोग भावी डॉक्टरांच्या शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी व्हावा,’ या उदात्त हेतूने देहदानाचा संकल्प केला होता. दुःखाच्या प्रसंगातही त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या या इच्छेचा आदर केला. त्यांनी केवळ देहदानच नव्हे, तर नेत्रदान करण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला. यामुळे अंध व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाशाची नवी पहाट येणार असून, वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा देह उपलब्ध झाला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा पंकज तुपे, सून वृषाली, मुलगी प्रणिता मुकादम, जावई संजय मुकादम, नातवंडे व सुना असा परिवार आहे. या सर्वांनी दाखवलेले सामाजिक भान समाजासाठी दीपस्तंभ ठरत आहे.
हे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. या प्रक्रियेत शरीररचनाशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांच्यासह पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिहीर लोंढे, श्रेयश जोशी, राज पेडणेकर आणि वाहन चालक सौरभ जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यात समीर करमरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. तुपे कुटुंबीयांच्या या अनुकरणीय आणि प्रेरणादायी दातृत्वाबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.




