निधीमहाराष्ट्रमुंबई

अंजनगाव सुर्जी येथे श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

८० कोटी २६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला गती
धार्मिक-सांस्कृतिक पर्यटनासह स्थानिक रोजगाराला चालना देण्यात येणार

B1न्यूज मराठी नेटवर्क500

मुंबई, दि. २९ : अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराज यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून, सुमारे ८० कोटी २६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती चळवळीचा वारसा आणि संत रूपलालजी महाराजांचे समाजप्रबोधनाचे विचार जतन होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वर्षा निवासस्थान येथे जिल्हा अमरावती मधील अंजनगाव सुर्जी येथे श्री संत शिरोमणी रुपलालजी महाराज राष्ट्रीय स्मारक विकास आराखडा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीत विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. यावेळी आमदार संजय कुटे,आमदार गजानन लवाटे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव वित्त विकासचंद्र रस्तोगी, अपर मुख्य सचिव महसूल विकास खारगे, अपर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मिलींद म्हैसकर, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव,ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमरावती आशिष येरेकर यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंजनगाव सुर्जी येथे मौजे जेठमलपूरमध्ये हे राष्ट्रीय स्मारक आकार घेणार आहे. या स्मारकासाठी जागेचा प्रस्ताव सादर करावा. संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या संत रूपलालजी महाराज यांनी समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्मप्रसाराच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.500विकास आराखड्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाविक, वारकरी आणि पर्यटकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व निवासी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामध्ये सभामंडप, पोथीवाचन सभागृह, योग केंद्र, वस्तुसंग्रहालय, अन्नपूर्णा इमारत, शहानूर इमारत, दिंडी सभागृह, वसतिगृह, चंद्रभागा इमारत, प्रवचन सभागृह, बहुउद्देशीय सभागृह, निवासी खोल्या, प्रशासकीय इमारत आणि कर्मचारी निवासस्थानांचा समावेश आहे. या सुविधांमुळे धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन, पोथीवाचन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुसज्ज जागा उपलब्ध होईल. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी निवासासह अन्य आवश्यक सुविधाही निर्माण केल्या जाणार आहेत.

या स्मारकामध्ये मुख्य स्मारकासोबत शहानूर नदीवरील पूल, २.४० किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता, संत रूपलालजी महाराजांचा पुतळा आणि अन्य पुतळ्यांची उभारणीही आराखड्यात समाविष्ट आहे. या कामांमुळे स्मारकापर्यंत पोहोचणे सुलभ होऊन परिसरातील पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे. हे राष्ट्रीय स्मारक धार्मिक श्रद्धेसह सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक वारसा जतन आणि पर्यटन विकासाचे केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे. आधुनिक व पर्यावरणपूरक सुविधांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या विकास आराखड्याचे सादरीकरण केले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button