प्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

अंमली पदार्थांविरोधात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विभागांनी समन्वय साधावा ; शाळा – महाविद्यालयांच्या परिसरात नियमित तपासणी करा – अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर, बार्शी : अंमली पदार्थांच्या सेवनाला आळा घालण्यासाठी तसेच युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील १०० मीटर क्षेत्रातील टपऱ्या आणि इतर विक्रेत्यांची वेळोवेळी तपासणी करावी, असे निर्देश जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन (NCORD) समितीच्या बैठकीत देण्यात आले.

दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण येथे जिल्हास्तरीय NCORD समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अंमली पदार्थांचे सेवन, विक्री व अवैध व्यवहारांना प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

शाळा-महाविद्यालय परिसरात नियमित तपासणी
आरोग्य, शिक्षण आणि पोलीस विभागाने समन्वय साधून संयुक्त पथकांमार्फत शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील १०० मीटर क्षेत्रात असलेल्या टपऱ्या व इतर विक्रेत्यांची नियमित तपासणी करावी. निर्भया पथकाने दिवसभरात किमान चार महाविद्यालयांना भेटी देऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करावेत, असे निर्देश देण्यात आले.
500व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्ह्यातील मानसोपचार तज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत संबंधितांना पत्रव्यवहार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तींना योग्य उपचार व पुनर्वसनाच्या सुविधा मिळण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.

अंमली पदार्थांविषयी माहिती देण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेल्या विविध माध्यमांची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देश देण्यात आले. अंमली पदार्थांशी संबंधित माहिती देण्यासाठी MANAS हेल्पलाइन क्रमांक १९३३ याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. तसेच गुप्त प्रयोगशाळांशी संबंधित संशयास्पद बाबींची ओळख पटविण्यासाठी आवश्यक माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या https://ncbmanas.gov.in/awareness या संकेतस्थळावरून प्राप्त करून जनजागृती करावी.
नागरिकांना अंमली पदार्थांविषयीची गोपनीय माहिती देता यावी, यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक ८६९८०४०५४२ वर चॅटबॉटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी ‘SOLAPUR RURAL POLICE’ या नावाने व्हॉट्सॲप चॅनेल सुरू करण्यात आले आहे.

नागरिकांनी उपलब्ध संपर्क माध्यमांचा वापर करावा
अंमली पदार्थांविषयी माहिती देण्यासाठी तसेच संबंधित बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२१७-२७३२००९ आणि डायल-११२ ही सुविधाही नागरिकांसाठी उपलब्ध आहे. या सर्व संपर्क माध्यमांची व्यापक प्रसिद्धी करून नागरिकांना त्यांचा वापर करण्याबाबत अवगत करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

संबंधित विभागांनी बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजीपर्यंत pi.solapur.lcb@gmail.com या ई-मेल पत्त्यावर तातडीने सादर करावा, असेही सूचित करण्यात आले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button