महाराष्ट्रसोलापूर

बांधबंदिस्ती, जलसंधारण आणि पीक नियोजनातूनच दुष्काळावर मात! नैतिक मूल्ये, सामाजिक शिस्त आणि लोकसभागातून दुष्काळावर मात शक्य : पद्मश्री पोपटराव पवार

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार, कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे आणि प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर आदी.

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्यस्तरीय दुष्काळ परिषद; तज्ज्ञांचे विचारमंथन

सोलापूर, दि. ३० : दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ शासकीय योजनांवर अवलंबून राहून चालणार नाही, तर समाजात नैतिक मूल्यांची जपणूक, सामाजिक शिस्त आणि सामूहिक जबाबदारीची भावना रुजणे आवश्यक आहे. शेतशिवारांची शास्त्रीय पद्धतीने बांधबंदिस्ती, पावसाच्या पाण्याचे प्रभावी नियोजन, जलसंधारण आणि पिकांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन हेच दुष्काळावर मात करण्याचे प्रभावी उपाय आहेत, असे प्रतिपादन हिवरे बाजारचे आदर्श सरपंच, पद्मश्री पुरस्कारप्राप्त पोपटराव पवार यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेचे प्रास्ताविक व स्वागत सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांनी केले. या परिषदेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी केलेले विचारमंथन, चर्चेतून पुढे आलेल्या सूचना आणि दुष्काळ निवारणासाठी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांच्या आधारे एक सर्वसमावेशक धोरणात्मक दस्तऐवज तयार करून तो शासनास सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी करून दिला.

पोपटराव पवार म्हणाले, महाराष्ट्राने दुष्काळ निवारणासाठी आजवर अनेक योजना आणि उपाययोजना राबविल्या; मात्र त्यामध्ये नैतिक अधिष्ठान, सामाजिक मूल्ये आणि सामूहिक शिस्त यांचा पुरेसा अंतर्भाव झाला नाही. त्यामुळेच वारंवार दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळ निवारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. पाण्याचा वापर, जमिनीचे व्यवस्थापन आणि पीकपद्धती यामध्ये शिस्त आली, तर दुष्काळाची तीव्रता निश्चितच कमी करता येऊ शकते.500पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात नैतिक मूल्ये, लोककल्याण आणि समाजहिताला सर्वोच्च स्थान दिले. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा आदर्श आजही काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रेरणादायी ठरत आहे. महाराष्ट्राला धार्मिक, सांस्कृतिक, वारकरी आणि सामाजिक चळवळींची समृद्ध परंपरा लाभली आहे. जल, जमीन आणि जंगल यांचे संवर्धन ही आपल्या संस्कृतीचीच ओळख आहे. ही परंपरा केवळ जपून न ठेवता तिचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्याची आज गरज आहे, असेही पद्मश्री पोपटराव पवार यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ निवारणासाठी ठोस उपाययोजनांची गरज : कुलगुरू

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले की, दुष्काळाच्या समस्येवर केवळ चर्चा न होता त्यामागील कारणांचा सखोल अभ्यास, विविध उपाययोजनांचे मूल्यमापन आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने विद्यापीठाच्या वतीने राज्यस्तरीय दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वननीती, जलनीती आणि लोककल्याणकारी विचारांचा अवलंब विद्यापीठाच्या कामकाजात केला जात आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने सामाजिक भान, भूतदया आणि निसर्गसंवर्धनाची जबाबदारी ओळखून वर्तन करणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

परिषदेच्या सत्रात अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव जूगळे यांनी मार्गदर्शन केले. दुष्काळाची कारणे, त्याचे सामाजिक व आर्थिक परिणाम तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर तज्ज्ञांनी आपले विचार मांडले.

या राज्यस्तरीय परिषदेस विविध प्राधिकरणांचे निमंत्रित सदस्य, विद्यापीठातील सर्व संकुलांचे संचालक, जिल्ह्यातील शेतकरी, तलाठी, ग्रामसेवक, सहाय्यक कृषी अधिकारी, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार डॉ. अंबादास भासके यांनी मानले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button