बदलत्या काळाची गरज ओळखून डी. वाय. पाटील समूहाचे आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : पिंपरी-चिंचवड ही केवळ उद्योगनगरी नसून राज्याच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. त्यामुळे या शहराची आरोग्य व्यवस्था सक्षम आणि आधुनिक असणे आवश्यक आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून डी. वाय. पाटील समूहाने आरोग्य क्षेत्रात सुरू केलेल्या विविध उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील बहुअवयव प्रत्यारोपण केंद्र, माता व बाल संगोपन विभागातील ‘आई व गोकुळ’, तसेच कृत्रिम गर्भधारणा आणि एंडोस्कोपी केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, महाविद्यालयाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. एन. जे. पवार, डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त यशराज पाटील यांच्यासह डॉक्टर्स, विद्यार्थी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, डी. वाय. पाटील यांच्या दूरदृष्टीतून आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्या कर्तृत्वातून उभे राहिलेले शैक्षणिक व वैद्यकीय विश्व आज हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि लाखो रुग्णांना आरोग्यसेवा देत आहे. आरोग्य ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आरोग्यसेवा ही केवळ सुविधा उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित नसून समाजाप्रती असलेली मोठी जबाबदारी आहे. या भावनेतून डी. वाय. पाटील समूहाचे कार्य सुरू आहे, हे कौतुकास्पद आहे. आधुनिक आरोग्य व्यवस्था म्हणजे केवळ अत्याधुनिक उपकरणे नव्हेत, तर अचूक निदान, योग्य उपचार, संशोधन, प्रशिक्षण, रुग्णांचे समुपदेशन आणि माणुसकीपूर्ण सेवा यांचा समन्वय होय, असेही त्यांनी सांगितले.

डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आधुनिक सुविधा, स्वच्छता आणि नीटनेटकेपणासह रुग्णांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. येथे मोठ्या संख्येने रुग्णांना आरोग्यसेवा दिली जात असून, वैद्यकीय तंत्रज्ञानातील बदलांचा स्वीकार करून विविध गंभीर आजारांवर आधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात येत आहेत, ही उल्लेखनीय बाब आहे. अनेक कुटुंबांसाठी आजारापेक्षा उपचारांचा खर्च ही मोठी चिंता असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, माजी सैनिक आरोग्य योजना आणि राज्य कामगार विमा योजना आदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.500अत्याधुनिक उपचार आणि सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्यसेवा यांचा समतोल साधणे ही आजच्या काळाची गरज आहे. रुग्णांचा वेळ आणि पैसा वाया जाऊ नये, हीच आरोग्यसेवेची खरी दिशा असली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले. यावेळी मराठी साहित्य परिषदेने डॉ. पी. डी. पाटील यांची अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

दर्जेदार आरोग्यसेवेसाठी शासनाचा आग्रह : प्रकाश आबिटकर
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने भविष्यातील आरोग्यविषयक गरजा ओळखून सुरू केलेल्या बहुअवयव प्रत्यारोपण केंद्र, ‘आई व गोकुळ’, कृत्रिम गर्भधारणा आणि एंडोस्कोपी केंद्रामुळे पुणे शहरासह महाराष्ट्रातील तसेच राज्याबाहेरील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या केंद्रांमधून अत्यंत महत्त्वपूर्ण, आवश्यक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

डी. वाय. पाटील समूहाचे आरोग्य क्षेत्रातील काम ‘स्टेट ऑफ द आर्ट’ असून, सामान्य नागरिकांना शासनाच्या तसेच खासगी रुग्णालयांमध्ये अधिकाधिक दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी शासन आग्रही आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना विविध आजारांवर मोठ्या प्रमाणात मोफत उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या डी. वाय. पाटील रुग्णालयाचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे. स्वर्गीय डी. वाय. पाटील यांचा वारसा पुढील पिढी समर्थपणे पुढे नेत असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी नमूद केले.

यावेळी डॉ. भाग्यश्री पाटील यांनी प्रास्ताविकात डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या स्थापनेपासून झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विद्यापीठ व रुग्णालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध मान्यवर उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या