मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन
B1 न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सहकुटुंब पारंपरिक पद्धतीने श्रीगणेशाची पूजा-अर्चा करून आरती केली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाचा आनंद उत्साहात साजरा करताना पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. पारंपरिक श्रद्धा आणि संस्कृतीचा आदर राखत पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करणे ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना केल्यानंतर त्यांनी राज्यातील तसेच देशभरातील गणेशभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विघ्नहर्ता श्रीगणेशाने सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर करून आनंद, नवचैतन्य, सामर्थ्य आणि समृद्धी प्रदान करावी तसेच देश, राज्य, नागरिक आणि बळीराजासमोरील सर्व अडचणी दूर व्हाव्यात, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.




