मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू; ८ ऑगस्टपर्यंत गणना अर्ज सादर करण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, या संदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. मतदार नोंदणी अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, सध्याच्या मतदार यादीतील मतदारांनी दि. ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित गटस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करावेत. बीएलओ गृहभेटीद्वारे हे अर्ज स्वीकारणार आहेत.

गणना अर्ज योग्यरीत्या भरून स्वाक्षरीसह सादर केलेल्या मतदारांची नावे दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.

दरम्यान, ज्या पात्र नागरिकांची नावे प्रारूप यादीत आढळणार नाहीत किंवा जे नवीन मतदार म्हणून नोंदणी करू इच्छितात, त्यांना दि. १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (घोषणापत्रासह) भरून अर्ज करता येणार आहे. याच कालावधीत मतदार यादीतील माहिती दुरुस्त करण्यासाठी नमुना ८, तर नाव वगळण्यासाठी नमुना ७ भरता येईल.500दावे व हरकतींची छाननी व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक कार्यालयाने नागरिकांना महत्त्वाचा इशाराही दिला आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना खोटी घोषणा किंवा चुकीची माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

तसेच, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची प्रक्रिया थांबत नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २२ व २३ नुसार पात्र व्यक्तींना पुढेही नमुना ६ द्वारे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. मतदार यादीतील सुधारणा ही निरंतर अद्यतन प्रक्रिया (Continuous Updation) असून, कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत दुरुस्तीची संधी उपलब्ध असते, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने राज्यातील सर्व पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज भरून मतदार यादीत आपले नाव निश्चित करण्याचे आवाहन केले आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या