पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर
जिल्ह्यातील ४६ हजार ४६ शेतकऱ्यांचा समावेश ; कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी दोन दिवसांत आधार प्रमाणीकरणाचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव,दि.२५ जुलै : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या दुसऱ्या यादीमध्ये जिल्ह्यातील ४६ हजार ४६ थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश असून, संबंधित शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी तातडीने आधार प्रमाणीकरण करून ॲग्रीस्टॅक क्रमांक सादर करावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने केले आहे.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेला मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असलेले आणि 1 एप्रिल २०१९ नंतर वितरित झालेले दोन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीक कर्ज कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘वन टाईम सेटलमेंट’ (ओटीएस) योजना लागू करण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२७ पूर्वी थकबाकीची रक्कम भरल्यास शासनाकडून दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे.नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महा-आयटीने विकसित केलेल्या संगणकीय पोर्टलवर बँकांनी थकीत पीक कर्जदारांची माहिती भरली होती.त्याआधारे २२ जुलै २०२६ रोजी ५३३ शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानंतर २४ जुलै रोजी राज्यातील सुमारे १७ लाख शेतकऱ्यांची दुसरी यादी आधार प्रमाणीकरणासाठी जाहीर करण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध झालेल्या यादीत धाराशिव तालुक्यात ८ हजार ३८, उमरगा ५ हजार २५,कळंब ७ हजार ६७०, तुळजापूर ५ हजार ८७८, परांडा ५ हजार ८४१,भूम ६ हजार २४८, लोहारा २ हजार ११३ आणि वाशी ५ हजार २३३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
या याद्या ग्रामपंचायत,तलाठी कार्यालय,चावडी,संबंधित बँक शाखा तसेच विविध मोबाईल गटांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.यादीतील प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे आधार कार्ड, यादीतील विशिष्ट क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक घेऊन जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नसेल,त्यांनी तो सेवा केंद्रातून तत्काळ तयार करून घ्यावा.





