गोरगरिबांच्या हक्काच्या रेशन तांदळाचा काळाबाजार उधळला! बार्शी तालुका पोलिसांची धडक कारवाई; ₹८.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन जणांवर गुन्हा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी, दि. २४ : गोरगरिबांच्या हक्काचे सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) अंतर्गत मिळणारे अन्नधान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध बार्शी तालुका पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत तब्बल ₹८,९८,२३० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, रेशन तांदळाच्या काळाबाजाराला मोठा आळा बसला आहे.

अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बार्शी–सोलापूर रोडवरील सौंदरे गावाजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी एमएच-१३-डीक्यू-६१८४ क्रमांकाची महिंद्रा मॅक्स पिकअप अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये विविध रंगांच्या प्लास्टिकच्या कट्ट्यांमध्ये भरलेला ४,६९० किलो तांदूळ आढळून आला.

तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील असल्याचा संशय आल्याने वाहनासह संपूर्ण माल ताब्यात घेऊन पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय, बार्शी यांच्याकडे खातरजमासाठी पाठविण्यात आला. त्यांच्या अहवालात हा तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ८० कट्ट्यांतील ४,६९० किलो तांदूळ आणि महिंद्रा मॅक्स पिकअप असा एकूण ₹८,९८,२३० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.500या प्रकरणी दिगंबर उर्फ आमरुषी उर्फ आप्पा संभाजी सुरवसे, विवेक उर्फ भगवान संभाजी सुरवसे (दोघे रा. बार्शी) आणि अक्षय राजाभाऊ बारसकर (रा. दत्तनगर, वैराग) यांच्याविरुद्ध शासकीय अन्नधान्याचा अपहार करून काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याप्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे करीत आहेत.

ही धडक कारवाई अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), विजय कबाडे (अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण) आणि सुहास जगताप (उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस अंमलदार युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, अमृत खेडकर आणि लक्ष्मण चित्तलवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बार्शी तालुका पोलीस स्टेशनकडून अवैध धंदे, रेशनचा काळाबाजार आणि समाजविघातक कृत्यांविरोधातील अशा धडक कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या