बार्शी तुळजापूर रोडवर मोठ – मोठे खड्डेच खड्डे

B1न्यूज मराठी नेटवर्क
देवी भक्तांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात प्रचंड नाराजीचा सुर
बार्शी : तुळजापूर या राज्यमार्गावर अनेक वर्षांपासून मोठ- मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साठल्याने रोडवर सर्वत्र डबके निर्माण झाले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने एसटी बस,भाविकांची चारचाकी व दुचाकी प्रवासी वाहने यांसह सर्वसामान्य प्रवाशांचीही वाट बिकट झाली आहे. या खुड्डयांमुळे छोटे – मोठे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हे खड्डे बुजवावेत अशी मागणी देवी भक्त व या मार्गावरील प्रवाशी वर्गातून होत आहे. या मार्गावरुन मराठवाड्यासह कर्नाटक राज्यात जाण्यासाठी रोज शेकडो एसटी बसेस व खाजगी वाहनांची ये- जा सुरु असते.
पुणे – मुंबई यांसह आसपासच्या जिल्ह्यातील देवी भक्त तुळजापूरला जाण्यासाठी बार्शी मार्ग जवळ असताना सुद्धादेखील टेंभुर्णी मार्गाने सोलापूर वरून तुळजापूरला जात आहेत त्यामुळे देवी भक्तांना जाण्यासाठी वेळ लागत असून रोडवर असणाऱ्या ठिक ठिकाणच्या टोल नाक्यामुळे, जास्तीचे लागणारे पेट्रोल लागत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एसटी बसेस व खाजगी वाहनांचे चाके या खड्डयामध्ये आदळून प्रवाशांना गंभीर ईजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोडवरील पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही पायाभूत व्यवस्था केली नसल्याने रोडवरील डांबरीकरण उखडून रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत.गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे या खड्ड्यांचे मोठे डबके निर्माण झाले आहे. या डबक्यांतून वाहन पुढे नेण्यासाठी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर प्रवाशांनाही या खड्डयांचा सामना करावा लागत आहे. रोडवर सर्वत्र पडलेल्या खड्डयात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना खड्डयांचा अंदाज येत नाही.
त्यामुळे या खड्डयांत वाहने आदळत आहे. तुळजापूर रोडवरील सर्व खड्डे बुजवावेत अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात येत्या काही दिवसात तुळजापूर रोडवर येणारे सर्व गावातील नागरिक सामुहिक रित्या आंदोलन करणार असल्याचे नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले. सध्या शारदीय नवरात्र महोत्सव मोठया उत्साहात चालू आहे परंतू या काळात मोठया संख्येने देवी भक्त दर्शन करण्यासाठी व ज्योत आणण्यासाठी या खडतर आणि खड्डेयुक्त रस्त्यांने आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत तसेच पोर्णिमेला बार्शीसह आसपासच्या तालुक्यातील देवी भक्त तुळजापूरला देवीच्या दर्शनाला चालत जात असल्याने पायांना गंभीर इजा व अपघाताची घटना घडू शकते त्यामुळे देवी भक्तांमधूनही हा रस्ता लवकर दुरूस्त करावा ही मागणी जोर धरू लागली असून देवी भक्तांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात प्रचंड नाराजीचा सुर पहायला मिळत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लेक्ष
बार्शी : तुळजापूर रोडवर अनेक वर्षांपासून मोठ मोठे खड्डे पडले असून हा रस्ता दुरूस्ती करण्यासाठी अधिकारी डोळेझाक करीत आहेत. बार्शी विभागाचे अभियंता सौरभ होनमुटे हे आतापर्यंतचे अधिकारी काळातील निष्क्रिय अधिकारी ठरले आहेत. स्वतः होनमुटे यांचे मुळ गाव तुळजापूर रोडवरील गौडगाव असतानाही त्यांच्या या कृतीमुळे गावकऱ्यांमध्ये संतप्त प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.