प्रा. डॉ. राहुल पालके यांचे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : जीवनात यश प्राप्त करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, कौशल्य आदींचा मिलाफ होणे आवश्यक असते. ध्येयपूर्तीच्या वाटेवर चालताना संयमाने संकटावर मात करून करिअर घडविता येते, असे मत श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राहुल पालके यांनी व्यक्त केले.जि.प. शाळा क्र. १ उपळाई ठोंगे येथे करिअर मार्गदर्शन या विषयावर त्यांचे व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर, यावलकर सर, लोंढे सर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. पालके म्हणाले, करिअर हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टीने मोलाचा घटक आहे. त्यासाठी नियोजन, व्यवस्थापन, निर्णयप्रक्रिया, वेळेचे व्यवस्थापन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सराव आदी बाबींवर विचार करणे गरजेचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात काय व्हायचे आहे ? त्यासाठी तुम्ही सध्या काय करताय ? तुम्ही कोणाला व कोणत्या ठिकाणी भेटी दिल्या? संवाद कौशल्ये व सामान्य ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत यावर भर दिला. त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षांची माहिती देत त्याचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले.
इस्रो या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी कोणत्या संधी आहेत याचा ऊहापोह केला. डिजीटल दुनिया व ती खारुताई या कवितांमधून त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. मुख्याध्यापक कांबळे सर यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत राहण्याची भूमिका मांडली. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर करताना ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय याचे विवेचन केले. याप्रसंगी यावलकर सर, लोंढे सर , शिक्षकवृंद , कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदरीत या उपक्रमातून विद्यार्थ्यांना करिअरचे मूलभूत मार्गदर्शन मिळाले.




