मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक, युवतींना मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे.प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च अमृत संस्थेकडून उचलला जातो. प्रशिक्षणाचा कालावधी फक्त १० दिवसांचा आहे.
प्रशिक्षणानंतर पीक पाहणी, औषध फवारणी, माती परीक्षण, बांधकाम प्रकल्पांचे निरीक्षण, प्रगतीचा अहवाल, सर्वेक्षण, भू-सर्वेक्षण, नकाशा बनवणे, हवाई चित्रीकरण, इव्हेंट कव्हरेज, पूर किंवा भूकंपासारख्या परिस्थितीत पाहणी व मदतीसह विविध संधी निर्माण होणार आहेत.
विविध अभ्यासक्रमांचा समावेश
मूलभूत एरोडायनॅमिक्स आणि ड्रोनचे प्रकार, नियम व कायदे, ड्रोन प्रणालीचे घटक आणि त्यांची देखभाल, प्रात्यक्षिक उड्डाण कौशल्ये आणि आपत्कालीन प्रक्रिया, हवामान आणि हवाई क्षेत्राचे ज्ञान या माध्यमातून घेता येणार आहे.
पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
वय किमान १८ वर्षे पूर्ण, किमान १० वी पास, शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम, अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केली जाते. निवड प्रक्रिया गुणवत्ता आणि स्थितीच्या आधारावर निश्चित केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, किंवा जिल्ह्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावर अर्जाची सविस्तर माहिती मिळणार आहे.
जिल्ह्यातून २०० जणांची निवड
अमृत संस्थेने प्रत्येक जिल्ह्यातून सर्वच घटकांसाठी विविध योजनांसाठी ५०० युवक-युवतींना मोफत प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, युवक युवतीनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकअक्षय लंबे यांनी केले आहे.




