​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

0

महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृततेचा लौकिक जपणाऱ्या उत्तुंग नेतृत्वाला मुकलो

B1न्यूज मराठी नेटवर्क

​नागपूर, दि. १२ : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राच्या शालीनता व सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे आणि तो राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनामुळे राजकारण-समाजकारणातील उत्तुंग अशा मार्गदर्शक नेतृत्वाला आपण मुकलो आहोत, अशी शोकभावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

​शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, चाकूरकर यांनी लातूरचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणात पाऊल टाकले. महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, संसदेच्या अनेकविध समित्यांचे सदस्य आणि पुढे केंद्रातील विविध खात्यांचे मंत्री, लोकसभा अध्यक्ष व पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची कारकिर्द राहिली. लोकसभा सदस्य म्हणून ते सातवेळा निवडून आले होते. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदेशी निगडित अनेक अभिनव उपक्रमांना आवर्जून चालना दिली. चाकूरकर यांचा वकील म्हणून संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यातूनच त्यांनी लोकसभेतील संसदीय कार्यप्रणाली आणखी बळकट केली.

​तत्त्वनिष्ठ, अभ्यासपूर्ण आणि ठामपणे मांडणी करणारे नेतृत्व म्हणून त्यांना देशाच्या राजकारणात आदराचे स्थान होते. चाकूरकर यांच्या निधनामुळे राजकारण-समाजकारणात सभ्यता, सुसंस्कृतता जपणारे, लोकशाहीवर गाढा विश्वास असणाऱ्या ज्येष्ठ नेतृत्वाला व महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे मी मानतो. चाकूरकर कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या