आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर दि.,१० : जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी बाधवाच्या कुटुंबातील मुला, मुलींना किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यताविभागाची जिल्हा कार्यकारणी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा कौशल्य कौशल्य ,रोजगार उद्योजकता विभागाचे सहाय्यकआयुक्त राजू वाकोडे, शिक्षणाधिकारी माध्यमिकच्या अश्विनी लाठकर, शासकीय तंत्रनिकेतनचे उपसंचालक प्रदीप दुर्गे,प्राचार्य. अभिजीत आलटे,,सिपेट प्रशिक्षण संस्थाचे व्यवस्थापक आर जीवन राम, , इंडो जर्मन टूल्स कंपनी व्यवस्थापक जयेश बागुल, छत्रपती शाहू महाराज महाविद्यालयाचे कमलाकर कदम, अटल इंक्युबेशन सेंटरशेख नवीद, देवगिरी शासकीय तंत्र निकेतन संस्था एस, जी .गोस्वामी यासह विविध प्रशिक्षण संस्थांच्या समन्वयक आणि प्राचार्य यांची उपस्थिती होती.
जिल्हास्तरीय किमान कौशल विकास कार्यक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण उपक्रमामध्ये जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरुण, तरुणींना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील सैन्य दलातील निवृत्त झालेल्या माजी सैनिक आणि त्यांच्या पाल्यांनाही प्रशिक्षणास प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज बैठकीत दिले.
कौशल्य, रोजगार ,उद्योजकता व नावीन्यता जिल्हा कार्यकारणी समितीच्या अंतर्गत असणाऱ्या विविध प्रशिक्षण संस्था ,शासकीय संस्था, अर्ध शासकीय आणि खाजगी कंपन्यांच्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण व्हावे. आगामी काळातील पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्यांची गुंतवणूक आणि निर्मिती जिल्ह्यामध्ये होत असून या कंपन्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन जिल्ह्याचा रोजगार निर्मितीमधील सहभाग मोठ्या प्रमाणात असावा यासाठीचे प्रशिक्षण वर्ग आणि त्याचे आयोजन , नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज संबंधित प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा कौशल्य विकास विभागाला दिले.
जिल्हातील कौशल्य विकासाच्या अंतर्गत एकत्रित रोजगार निर्मितीसाठी सर्व संस्थाने समन्वयातून विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे नियोजन करावे. ज्या प्रशिक्षणार्थींची जास्त गरज औद्योगिक क्षेत्रांना असते त्याला प्राधान्य देण्यात यावे .कौशल्य विकास योजना अंतर्गत जागतिक बँकेचा दक्ष हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्येही मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घ्यावा. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ,प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, आर्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र याच्या अंतर्गतही तरुणांना प्रशिक्षण दिले जाते. शासकीय तंत्रनिकेतन आणि विविध कंपन्यांचे स्वायत्त असलेल्या प्रशिक्षण संस्थांमधून तरुणांना मोठ्या प्रमाणात विविध कौशल्य आधारित प्रशिक्षणाची निवड आणि संधी उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये गरजू आणि बेरोजगार तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्यात यावे.
जिल्ह्यामध्ये या सर्व संस्थांनी अत्यावश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी असलेले अभ्यासक्रम आगामी पाच वर्षाच्या अनुषंगाने निवड करून तयार करावेत .व यामध्ये आवश्यक असल्यास काही नवीन अभ्यासक्रमाचा ही समावेश करावा असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.




