जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात दि.१५ व १६ रोजीव्यसनमुक्तीचा जागर; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.८ : वर्षाअखेर निमित्त होणाऱ्या युवकांच्या मद्यपार्ट्या तसेच समाजामध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून त्याविरोधात कायदेशीर कारवाई सोबतच जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या सोमवार दि.१५ व मंगळवार दि.१६ रोजी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात व्यसनमुक्तीचा जागर केला जाईल,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा रुग्णालयाचे डॉ. महेश लढ्ढा तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात अंमली पदार्थ मिळण्याची ठिकाणे शोधणे, प्रतिबंधित औषधांची विक्री थांबवणे, युवकांना व्यसनांच्या जाळ्यात अडकविण्याच्या उद्देशाने कार्यरत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणे अशा विविध उपायांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शेतीत गांजा लागवड करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहिम सुरु करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, वर्षाची अखेर ३१ डिसेंबर या दिवशी मोठ्या प्रमाणावर पार्ट्या करुन मद्यपान वगैरे प्रकार होत असतात. अनेक महाविद्यालयीन युवकांचा त्यात भरणा असू शकतो. त्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात सोमवार दि.१५ व मंगळवार दि.१६ रोजी व्यसनमुक्तीचा जागर करण्यात येईल. सर्व महाविद्यालयांमध्ये व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगून जनजागृती करण्यात येईल,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. या उपक्रमासाठी उपसंचालक उच्च शिक्षण यांनी पुढाकार घ्यावा,असेही त्यांनी निर्देशीत केले.




