ताडसौदने शाळेचा तालुक्यात दणदणीत विजय; सलग चौथ्यांदा लंगडीत प्रथम क्रमांक
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्हा परिषद आयोजित बार्शी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा सुलाखे मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये आगळगाव केंद्रातील जि. प. प्राथमिक शाळा ताडसौदने येथील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
लंगडी स्पर्धेत ऐतिहासिक यश लंगडी या खेळामध्ये लहान गट मुलींच्या अंतिम सामन्यात ताडसौदने शाळेने पानगाव शाळा क्र. 2 संघाचा तब्बल एक डाव राखून पराभव करत सलग चार वेळा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी भक्कम मजल मारली. तर मोठा गट मुलींच्या गटात ताडसौदनेच्या संघाने वैराग बीटमधील धामणगाव संघाचा पराभव करीत सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत स्थान निश्चित केले.
धावण्याच्या स्पर्धेतही चमकदार कामगिरी
100 मीटर (मोठा गट मुली) — कु. भक्ती सचिन चौधरी हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला.
100 मीटर (लहान गट मुली) — कु. रिया विशाल कसबे हिला तृतीय क्रमांक. 200 मीटर (लहान गट मुली) — कु. दुर्वा विशाल चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळविला.
बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळी मोठा गट मुलींत कु. परी विनोद जाधव हिने सलग दोन वेळा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. मोठा गट मुलांमध्ये कु. नचिकेत प्रदीप भांगे याने द्वितीय क्रमांक पटकावला.
लहान गट मुलींत कु. ज्ञानेश्वरी ज्ञानदेव पाटील हिने तृतीय क्रमांक मिळवला, तर लहान गट मुलांमध्ये कु. देवदत्त विनोद जाधव याने तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला.
सर्व विजयी खेळाडूंना गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके, विस्ताराधिकारी भारत बावकर, विस्ताराधिकारी जाधवर तसेच केंद्रप्रमुख यांच्या हस्ते ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले. शाळेच्या या अभुतपूर्व यशाबद्दल मुख्याध्यापिका, सर्व मार्गदर्शक शिक्षकवर्ग, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, सरपंच, उपसरपंच तसेच सर्व ग्रामस्थांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.




