दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली, 02 : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दि. 12 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांनी दिली.

कस्तुरबा मार्गांवरील महाराष्ट्र सदनात आयोजित या महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक खाद्यसंस्कृतीचा आणि कलेचा संगम पाहायला मिळणार आहे.नवरसांनी पूर्ण अशा चवदार पदार्थांची रेलचेल दिल्लीकरांना या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते उद्घाटन, पाककृतींची मेजवानी

या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते होणार आहे. खाद्य महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ उपलब्ध असतील. नागपूर विभागातील सावजी चिकन किंवा मटण रस्सा, तार्री पोहा आणि संत्री-आधारित मिठाई; पुणे भागातील मिसळ पाव, वडा पाव आणि पुरण पोळी; जळगावातील शेव भाजी, भरित (वांग्याचे भरित) आणि केळीशी संबंधित पदार्थ; मालवणातील मालवणी सीफूड, कोंबडी वडे आणि सोल कढी; औरंगाबाद मधील नान कालिया, डालिंबी उसळ आणि स्थानिक बिर्याणी; तसेच कोल्हापुरी नॉन-व्हेजमधील तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन किंवा मटण यांचा समावेश असेल. हे पदार्थ महाराष्ट्राच्या समृद्ध पाककृती परंपरेचे प्रतिनिधित्व करतील.

या खाद्य महोत्सवात सातारा, कोल्हापूर, जळगाव,पुणे अमरावती, रायगड या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतर्गत असलेले महिला स्वयंम सहायता समूह सहभागी होणार असून त्यांच्याकडील रुचकर पदार्थांचा देखील गरमागरम आस्वाद घेता येणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालकांसाठी विशेष आकर्षण

हा महोत्सव केवळ खाद्यपदार्थांपुरता मर्यादित नसून, महाराष्ट्राची समृद्ध कला आणि संस्कृती दर्शवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.लहान मुलांसाठी खास आकर्षण म्हणून ‘करमणूकीचे’चे खेळ आणि जादूचे विस्मयकारक प्रयोग ठेवण्यात आले आहेत. ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना या महोत्सवाचा आनंद घेता येईल.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ स्टॉलद्वारे पर्यटन स्थळांचे दर्शन

या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (MTDC) विशेष माहिती स्टॉल देखील असणार आहे. या स्टॉलद्वारे महाराष्ट्रातील ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती देण्यात येईल. पर्यटन स्थळांच्या माहितीपत्रकांचे वितरण करून महाराष्ट्राच्या पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्याचा मानस असल्याचे श्रीमती विमला यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या अस्सल चवीचा संस्कृतीचा, पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी दिल्लीतील नागरिकांनी या तीन दिवसीय खाद्य महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमती विमला यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या