वाशिम-रिसोड नगरपरिषद निवडणुका अंशतः स्थगित; इतर जागांसाठी प्रक्रिया पूर्ववत
B1न्यूज मराठी नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत आज महत्त्वाची घडामोड घडली आहे. राज्य निवडणूक आयोगाने वाशिम आणि रिसोड या दोन नगरपरिषदांमधील काही विशिष्ट जागांवरील निवडणूक कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उर्वरित पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेश क्रमांक रानिआ-२०२५ / सुनिका / न.प. / प्र.क्र.१४ / का-६ दिनांक २९.११.२०२५ नुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
आदेशानुसार वाशिम नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पद तसेच सर्व सदस्य पदे आणि रिसोड नगरपरिषदेसाठी प्रभाग ५ ‘ब’ सर्वसाधारण व प्रभाग १० ‘अ’ सर्वसाधारण महिला वगळता इतर सर्व पदांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या मूळ कार्यक्रमानुसार वाशिम, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा नगरपरिषद आणि मालेगाव नगर पंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका सुरू होत्या. मतदान व मतमोजणीच्या तयारीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असताना निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे संबंधित प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रिया तात्पुरती थांबविण्यात आली आहे.
ही स्थगिती संबंधित प्रभागांतील काही प्रलंबित कायदेशीर प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली असून त्या पूर्ण होईपर्यंत निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. मात्र, उर्वरित पदांसाठी निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसार सुरळीतपणे राबविण्यात येणार असल्याने प्रशासन आणि निवडणूक यंत्रणेची कामे पूर्ववत सुरू असणार आहेत.




