जमिनीचे आरोग्य सुधारणे व उत्पादन वाढीसाठी नैसर्गिक शेती करा – जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेचे आवाहन
जिवाणू संघाची उपयोगिता व उपलब्धतेबाबत जनजागृती
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती, दि. 27 : आज जागतिक स्तरावर सुरक्षित अन्नपदार्थांचा प्रश्न भेडसावत असताना, शेतीमालासाठी होणारा रासायनिक कीटकनाशकांचा ९५ टक्क्यांहून अधिक वापर ही एक मोठी चिंता आहे. रासायनिक निविष्ठांच्या अति वापरामुळे जमिनीचा कस कमी होत चालला असून मानवी आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक (जैविक व सेंद्रीय) निविष्ठांचा वापर वाढवून ‘रेसिड्यु फ्री’ शेतीकडे वळणे काळाची गरज बनली आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी जिवाणू संघाचा उपयोग शेती व शेतीपिकांच्या उत्पादन वाढीसाठी करावा, असे आवाहन जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेव्दारे करण्यात आले आहे.
अमरावती येथील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळा, कृषि संकुल, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोड (पिन कोड ४४४६०२) येथे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या जीवाणू संघांची उपलब्धता करण्यात आली आहे. प्रयोगशाळेला संपर्क करण्यासाठी ०७२१-२५५०३७२ संपर्कक्रमांक दिला आहे. या प्रयोगशाळेत पुढीलप्रमाणे जैविक निविष्ठा उपलब्ध आहेत. नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू : रायझोबियम, अझॉटोबक्टर, स्फुरद (फॉस्फरस) विरघळविणारे जिवाणू, पालाश (पोटॅश) विरघळविणारे व वहन करणारे जिवाणू, द्रवरूप जिवाणू संघ: वरील नमूद तिन्ही जिवाणू एकत्रित असलेले द्रावण आदींचे उत्पादन शासनाने ठरवून दिलेल्या दरांनुसार व नियमांनुसार वैयक्तिक शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच या प्रयोगशाळेव्दारे महाविद्यालयीन विविध शाखेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या जिवाणु उत्पादनाबाबत व त्यांच्या कार्यपद्धतीबाबत विस्तृत माहिती व प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात येते.
100 मिली बॉटल 50/- रुपये, 250 मिली बॉटल 110/- रुपये तर 500 मिली बॉटल 210/- रुपये या शासकीय विक्री दराप्रमाणे जिवाणूसंघाचा विक्री दर आहे.
रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीचा पोत खालावत चालला आहे. तिचे आरोग्य सुधारवयाचे असेल तर नैसर्गिक (जैविक व सेंद्रीय) निविष्ठांचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रीय घटकांचे प्रमाण सुधारण्यात मदत होते. जिवाणू संघाच्या वापराचा दुरगामी, शाश्वत, अनुकूल परिणाम मृदा, जल, मानवी व इतर जैव परिसंस्थेवर होतो. जैविक निविष्ठांचे बहुआयामी फायदे आहेत. जैविक खतांचा वापर वाढवल्यास जमिनीचे आरोग्य सुधारते आणि उत्पादन खर्चात कपात होते. याचे फायदे केवळ शेतीपुरते मर्यादित नसून ते पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहेत.
जैविक खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमीन भुसभुशीत होते व उत्पादन क्षमतेत वाढ होते, जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, असे भौतिक फायदे आहेत. जैविक खतामुळे जमिनीतील अन्नद्रव्य धरुन ठेवली जातात, दुबार पेरणीसाठी उपयुक्त नत्रसाठा शिल्लक राहतो, जमीनीचा सामु (pH) नियंत्रणात राहतो, याप्रमाणे रासायनिक फायदे आहेत. जैविक फायद्यांचे सांगावयाचे झाल्यास सुक्ष्म जिवांमार्फत सेंद्रीय घटकांचे विघटन होते, प्रदुषणकारक घटकांचे विघटन होते. तसेच रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी झाल्याने उत्पादन खर्च कमी होतो. धान्याचा दर्जा सुधारून पिकाचे उत्पादन वाढते. रसायनांचा वापर टाळल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते आणि मानवी आरोग्य सुधारते.
सेंद्रिय (जैविक) शेतीला चालना देण्यासाठी आणि रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी अमरावती येथील प्रयोगशाळेत तयार होणारी जैविक खते आपल्या शेतीसाठी वापरावीत, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून जैविक प्रयोगशाळेच्यावतीने करण्यात आले आहे. नैसर्गिक शेतीकडे वळल्यास शेतकऱ्यांना शाश्वत शेती, उत्तम उत्पादन आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळवण्याचा मार्ग सुकर होईल.




