दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांना तब्बल 16 कोटींची मंजुरी, आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केंद्रीय मार्ग निधी CRIF योजनेअंतर्गत 2025-2026 या वर्षासाठी एकूण 103 कामांना तब्बल 1688 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर कामांमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन महत्त्वपूर्ण रस्त्यांचा समावेश असून, त्यासाठी 16 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी CRIF योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मान्यता दिली जाते. या वर्षीच्या मंजुरीमध्ये दक्षिण तालुक्याचे विशेष वाढीव प्रतिनिधित्व दिसून येते.
या दोन रस्त्यांसाठी मोठ्या निधीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. स्थानिक नागरिकांनी वारंवार रस्ता दुरुस्तीबाबत मागण्या केल्या होत्या. यासंदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी राज्य आणि केंद्रस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्याप्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासनाने मंजुरीचा निर्णय घेतला आहे.
CRIF अंतर्गत मंजूर झालेल्या कामांमध्ये पहिल्या प्रकल्पात कुर्घोट – माळकवठे – निंबर्गी – विंचूर रस्त्याच्या सुधारणा कामासाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुसऱ्या प्रकल्पात मंद्रूप – निंबर्गी – भंडारकवठे रस्त्याच्या सुधारणा कामासाठी 10 कोटी रुपये दिले गेले आहेत. हा रस्ता दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला मुख्य महामार्गांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी आमदार सुभाष देशमुख यांचे आभार व्यक्त केले आहेत. पुढील काही महिन्यांत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून कामाला वेग येणार आहॆ. निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांनी शासनाचे आभार मानले आहेत.




