समाज कल्याण कार्यालयामार्फत संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दिनांक 25 : भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मूल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी संविधान दिनाचे आयोजन करण्यात येते. दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता संविधान दिनानिमित्त पार्क चौक सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात येणार असल्याचे समाज कल्याण च्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
तद्नंतर पार्क चौक सोलापूर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सात रस्ता सोलापूर पर्यंत संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सात रस्ता सोलापूर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात सेल्फी विथ संविधान हा सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार असून सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/स्वयं अर्थसहाय्यित शाळा/आश्रमशाळा व वसतिगृहे व सर्व नागरिक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण, सोलापूर यांनी केले आहे.




