धर्माधिष्ठीत समाज निर्मितीत संतांचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.२५ : आपल्या देशाला सनातन संस्कृतीची परंपरा आहे. या परंपरेतील धर्माधिष्ठीत समाजनिर्मितीत व राष्ट्राच्या उभारणीत संतांचे मोठे योगदान आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरुळ येथे केले.
संत जनार्दनस्वामी यांच्या वेरुळ येथील आश्रमात ॐ जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा सुरु आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज भेट दिली. संत शांतीगिरी महाराज हे त्यांचे समवेत उपस्थित होते. यावेळी आ. संजय केणेकर, आ. प्र्शांत बंब, सुरेश चव्हाणके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ७५१ कुंड यज्ञशाळा प्रवेश सोहळा तसेच भगवान शिव मूर्तिचे पूजन व उदघाट्न करण्यात आले. कार्यक्रम स्थळी येताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित संत महंत यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर संत नागेश्वरानंद आणि संत अवीमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी फडणवीस यांचे स्वागत केले.
आपल्या संबोधनात फडणवीस म्हणाले की, संत शांतीगिरी महाराजांच्या एका अनुग्रहाने लाखो लोकांचे जीवन बदलले आहे.संतांच्या शिकवणीमुळे आपली संस्कृती, धर्म प्रचाराचे कार्य सुरु आहे. देशात शांती स्थापन करुन आपला देश प्रगतीपथावर नेण्याचे कार्य पुर्णत्वास नेण्याचे सामर्थ्य या संतांच्या आशिर्वादात आहे. धर्माधिष्ठीत समाज निर्मितीसाठी व अशा समाजाद्वारे राष्ट्र उभारणीत संतांचे मोठे योगदान आहे,असे त्यांनी सांगितले.




