बार्टीमार्फत UPSC मुलाखतीसाठी अनुसूचित जातीच्या उमेदवारांना २५,००० रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी, BARTI) संघ लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा मुलाखत परीक्षा (Civil Services – Personality Test Examination) 2025 साठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत, मुलाखत परीक्षेच्या तयारीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक उमेदवारास रक्कम रु. २५,०००/- (पंचवीस हजार रुपये) चे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) नुकताच दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल (Main Examination Result) घोषित केला आहे. या निकालानुसार, जे उमेदवार आता मुलाखत परीक्षेसाठी (Personality Test Examination) पात्र ठरले आहेत, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
लाभ घेण्यासाठी आवाहन
सदर योजनेची सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज भरण्याचा फॉर्म बार्टी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी राज्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बार्टीच्या संकेतस्थळावरील खालील लिंकला भेट द्यावी:
http://barti.maharashtra.gov.in




