राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण, महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ पुरस्कार

0

नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली ,18 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जलव्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये (2024) महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्यावतीने तो स्वीकारला. तसेच उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विभागात नवी मुंबई महापालिकेने प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आज झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार – 2024 प्रदान करण्यात आले. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी, राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, विभागीय सचिव व्ही. एल. कांथाराव व विभागाचे सचिव अशोक, के. के. मीना यावेळी उपस्थित होते. विखे पाटील यांच्यासोबत राज्याच्या जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिपक कपूर उपस्थित होते. या मानांकन स्पर्धेत गुजरातला दुसरा तर हरियाणाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपतींकडून विजेत्यांचे अभिनंदन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, आपल्या भाषणात, अमृता इतक्याच मौल्यवान असलेल्या जल संसाधनाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक केले. भारतीय परंपरेमधे जलस्रोतांना पूजनीय मानले गेले आहे. माणूस अन्नाशिवाय काही काळ जगू शकेल, मात्र पाण्याशिवाय जगू शकत नाही, त्यामुळे पाण्याच्या संवर्धनासाठी काम करणारे कौतुकास पात्र आहेत, असे यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या. गेल्यावर्षी सुरू झालेल्या जलसंवर्धन जनसहभाग उपक्रमाद्वारे 35 लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचना उभारल्या गेल्या असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. देशात मर्यादित जलस्रोत असल्याने त्याचा वापर जपून करायला हवा आहे. हवामान बदलाचा जलस्रोतांवर परिणाम होत असून जलस्रोतांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ पुरस्कार अभिमानाची बाब

पुरस्कार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र सदन येथे माध्यमांशी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ म्हणून सन्मान प्राप्त होणे ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. राज्य सरकारने राबवलेल्या अभिनव जलव्यवस्थापन धोरणांचा आणि शेतकरी, पाणी वापर संस्था तसेच प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागाचा हा विजय आहे. बंद नलिका वितरण प्रणाली, उपसा सिंचन प्रकल्पांचे आधुनिकीकरण, नदी जोड प्रकल्प, पम्पिंग स्टोरेज योजना, जलाशयांवर फ्लोटिंग सौर प्रकल्प आणि सांडपाणी शुद्धीकरण-पुनर्वापर या सहा अभिनव संकल्पनांमुळे महाराष्ट्राला हे यश मिळाल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले.

महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रमुख यशासोबतच महाराष्ट्रातील इतर दोन संस्थांनाही महत्त्वाच्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले. “सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था” या गटात नवी मुंबई महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला. हा पुरस्कार आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला. “सर्वोत्कृष्ट जलवापरकर्ता संस्था” नाशिक जिल्ह्यातील कनिफनाथ जल/पाणी वापर सहकारी संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी यांनी स्वीकारला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या