वैद्यकीय व्यवसाय न राहता सेवाभाव झाला पाहिजे – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
प्रवरा आरोग्य विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या १९ व्या पदवीदान समारंभ
B1न्यूज मराठी नेटवर्क
शिर्डी, दि. १५ : “डॉक्टर हा देवळातील देवासारखा असतो. रुग्णाशी नम्रतेने बोलणे, योग्य तपासणी, अचूक निदान व योग्य मार्गदर्शन या गोष्टी डॉक्टरच्या प्रतिमेला आकार देतात. वैद्यकीय व्यवसाय हा केवळ व्यवसाय न राहता सेवाभावाने आचरणात आणला गेला पाहिजे,” असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
लोणी येथील प्रवरा आरोग्य विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या १९ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, विश्वस्त मोनिका सावंत, विश्वस्त ध्रुव विखे पाटील, कुलसचिव प्रा. डॉ. अरूणकुमार व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, “आजपासून प्रवरा अभिमत विद्यापीठात जागतिक दर्जाचे एमआरआय तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. अलीकडे जे तंत्रज्ञान रूबी हॉस्पिटलमध्ये स्थापण्यात आले, तेच तंत्रज्ञान ग्रामीण भागातील या विद्यापीठातही उपलब्ध झाले, ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
ते पुढे म्हणाले, “वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता व नवनवीन तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडत आहेत. अशा काळात डॉक्टरांवरची जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजसेवेची समर्पित भावना जपून आपण काम कराल, असा माझा विश्वास आहे.”
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला आरोग्य क्षेत्रात सर्वोच्च स्थानी नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले जनआरोग्य योजना अधिक उपयुक्त करण्यासाठी नवी उपचारसेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ग्रामीण, आदिवासी व डोंगराळ भागातील डॉक्टरांचे मानधन वाढवणे यांसह अनेक सकारात्मक निर्णय शासनाने घेतले आहेत. सर्वांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देणे हेच शासनाचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
“आज पदवीधर होणाऱ्या तरुण डॉक्टरांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. रुग्णांशी हसत-हसत संवाद साधा, नम्रतेने बोला—यामुळे रुग्णाला अर्धे बरे वाटते. डॉक्टर हा देवासमान मानला जातो; त्यामुळे देवासारखी सेवा करणे हेच आपले व्रत असले पाहिजे,” असे आबिटकर यांनी सांगितले.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, “ग्रामीण भागात सुरू झालेले प्रवरा आरोग्य विज्ञान विद्यापीठ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त संस्थेचे रूप धारण केले आहे. १९८४ मध्ये राज्यातील पहिले विनाअनुदानित आरोग्य महाविद्यालय सुरू करून पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी या विद्यापीठाची पायाभरणी केली. संघर्षातून उभी राहिलेली ही संस्था खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्वप्नपूर्तीचे प्रतीक आहे.”
ते म्हणाले, “गेल्या १९ वर्षांत या विद्यापीठातून घडलेले विद्यार्थी देश-विदेशात मानाच्या पदांवर काम करत आहेत. विद्यापीठाचा विस्तार, आधुनिक सुविधा व संशोधन-तंत्रज्ञानाच्या दिशेने डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.”
डॉ. विखे पाटील यांनी सांगितले, “नॅशनल रूरल हेल्थ मिशनचा पहिला आराखडा प्रवरा मेडिकल कॉलेजमध्येच तयार झाला. तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली इस्रो–डीआरडीओच्या मदतीने ५० हजार दिव्यांग मुलांना कॅलिपर उपकरण देण्याचा पहिला प्रयोगही प्रवरानगर–लोणी येथे झाला.”
ते पुढे म्हणाले, “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात संधी व आव्हानांचा सामना पदवीधरांनी धैर्याने करावा. विद्यापीठात रूजवलेली मूल्ये आणि प्रशिक्षणाच्या आधारावर प्रवऱ्याचे विद्यार्थी जगात मानाचे स्थान मिळवतील.”
यावेळी डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रवरा अभिमत विद्यापीठातील वैद्यकीय शाखांमधील सर्व महाविद्यालयांतील ९०० विद्यार्थ्यांना पदवी आणि १३ विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली.
आरोग्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट स्पीड एमआरआय स्कॅनिंग मशीन (कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे स्वयंचलित तंत्रज्ञान) तसेच मुखाचा कर्करोग चिकित्सा करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेला फिरता दंतदवाखाना यांचे लोकार्पण करण्यात आले. समारोपापूर्वी कुलगुरू डॉ. मगरे यांनी प्रवरा अभिमत विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.




