गुळपोळी येथे महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा, पद्मभूषण डॉ. विजय भटकर स्किल स्कूलचे उद्घाटन
भैरवनाथ विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : गुळपोळी येथील अभिजित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रविवार दिनांक 16 रोजी महासंगणकाचे जनक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांचा ग्रंथतुला अभिष्टचिंतन सोहळा व डॉ. विजय भटकर स्कील स्कूलचा उदघाटन समारंभ आयोजित केला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक व मुंबई येथील सेकंडरी स्कूल एम्प्लॉयईज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक प्रमोद (पप्पू) देशमुख यांनी दिली.
रविवारी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण डॉ.भटकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे चेअरमन डॉ.चंद्रकांत पाटील, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समाज कल्याण उपायुक्त संतोष चिकणे, सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, बार्शी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, उद्योजक अभिमन्यू नागवडे, गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके, सरपंच अर्चना चिकणे,संस्थेचे सचिव अभिजीत कापसे उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष अरुणभाऊ कापसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
यावेळी प्रशालेत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नावलौकिक कमावलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक देशमुख म्हणाले, गुळपोळी आणि परिसरातील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन 25 वर्षांपूर्वी अरुणभाऊ कापसे यांनी भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाची उभारणी केली.रौप्यमहोत्वी वाटचाल करीत असताना विद्यालयाने अनेक यशस्वी विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले आहे. गुळपोळी सारख्या ग्रामीण व दुर्लक्षित असलेल्या गावातील मुलींच्या शिक्षणाची सोय झाली आहे.
पद्मभूषण डॉ.भटकर यांनी आम्हाला वेळोवळी मार्गदर्शन केले. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर रहावा, यासाठी त्यांचे मार्गदर्शन व अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. तरी गुळपोळी पंचक्रोशीतील तसेच बार्शी तालुक्यातील नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक देशमुख यांनी केले आहे.




