राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

0

शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक : मुख्यमंत्री

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली : विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी आपल्या शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे. त्यांनी घडविलेली शिल्पे इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचा गौरव केला.

सुतार यांना आज राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार (2024) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. नोएडा (उत्तर प्रदेश) येथील श्री सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, खासदार महेश शर्मा, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर विमला, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, अनिल सुतार आदी उपस्थित होते.

शिल्पकला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सुतार यांना हा पुरस्कार देण्यात आला असून सन्मानचिन्ह, मानपत्र आणि २५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, सुतार यांनी घडविलेली शिल्पे अतिशय परिपूर्ण असून जगभरात ती दिमाखात उभी आहेत. त्यांच्या विविध कलाकृती त्यांच्यातील श्रेष्ठ कलाकाराची साक्ष देतात. सुतार यांच्या जीवनातील शिल्पांचे महत्व अलौकिक असून त्याच्या असामान्य सृजनशीलतेचा अविष्कार अनेक कलाकृतींमधून अनुभवयाला मिळतो. सुतार यांच्या मनात महाराष्ट्र असून त्याची प्रचीती पुरस्कार प्रदान करतेवेळी त्यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या जयघोषातून आली. सुतार यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की सुतार यांनी केवळ देशातच नव्हे तर जगभर शिल्पे उभारली आहेत. देशाचे स्टॅच्यूमॅन अशी त्यांची ओळख असून अनेक उंच पुतळे उभारणाऱ्या श्री सुतार यांच्यामुळे पुरस्काराचीच उंची वाढली आहे. प्रतिभावान ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असलेले श्री सुतार हे मराठी माणसाचा मानबिंदू आहेत.

महाराष्ट्र आणि देशाने सुतार यांच्या श्रेष्ठ कलेची अनुभूती घेतली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की सुतार हे महाराष्ट्राचा अभिमान असून त्यांचे या क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निर्मिलेला पुतळा इंदू मिल येथील स्मारकामध्ये उभारण्यात येणार आहे.

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुरस्कारा मागची भूमिका विशद करुन श्री सुतार यांनी कलेच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. सुतार परिवाराच्या वतीने अनिल सुतार यांनी मनोगतात या सन्मानाबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुतार यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली. याप्रसंगी स्वाती सुतार, सोनाली सुतार, समीर सुतार, दिवाकर शर्मा, कुलदीप मित्तल यांसह विविध अधिकारी आणि सुतार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या