राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा आजपासून
B1न्यूज मराठी नेटवर्क
सांगली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 19 वर्षाखालील शालेय मुला-मुलींच्या मल्लखांब स्पर्धांचे आयोजन तालुका क्रीडा संकुल मिरज या ठिकाणी दिनांक 12 व 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या स्पर्धेसाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई ,नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नागपूर व लातूर अशा 8 विभागातून एकूण 64 स्पर्धक सहभागी होणार आहेत. यामधून राज्याच्या टीमसाठी निवड केली जाणार आहे. स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची निवासाची व भोजनाची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू, व्यवस्थापक, पंच, निवड समिती सदस्य उपस्थित होत आहेत. स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.




