निवडणूक प्रचारासाठी झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा आदेश
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : राज्य निवडणूक आयोगाने दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम घोषित केला असून,या घोषणेपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
त्या अनुषंगाने, राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी किंवा हितचिंतक यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे,कापडी फलक लावणे,भित्तीपत्रके चिकटवणे, घोषणा लिहिणे इत्यादी कृती खाजगी व्यक्तींच्या मालकीच्या जागेवर, इमारतीवर,भिंतीवर अथवा सार्वजनिक जागेवर संबंधित मालक किंवा परवाना प्राधिकरणाची परवानगी न घेता करू नयेत,असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.
सदर आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून जारी करण्यात आला आहे.त्यांनी स्पष्ट केले आहे की, सार्वजनिक सुव्यवस्था व निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता राखण्यासाठी अशा कृतींवर निर्बंध घालणे आवश्यक आहे.
या आदेशानुसार,निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक जागेचा, इमारतीचा,आवाराचा किंवा भिंतीचा वापर संबंधित जागामालक व प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हा आदेश दि.४ नोव्हेंबर २०२५ ते दि.३ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात लागू राहील.सर्व संबंधितांनी या आदेशाचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.




