प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : सन २०२५-२६ मधील रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत सहभाग नोंदणीसाठी https://www.pmfby.gov.in हे राष्ट्रीय पीक विमा पोर्टल सुरु करण्यात आले आहे. ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर, गहू, हरभरा व कांदा पिकासाठी १५ डिसेंबर व उन्हाळी भुईमूगासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या मुदतीत पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून विभागातील पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी- फार्मर आयडी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडेकरार आदी कागदपत्रे आवश्यक असून ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे.
विमा अर्ज भरण्यासाठी सीएससी विभागास केंद्र शासनाने निर्धारित केलेले प्रति शेतकरी ४० रुपये मानधन संबंधित विमा कंपनीमार्फत दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या विमा हप्त्याव्यतिरिक्त इतर शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही. एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करुन विमा योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना पुढील पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.
जिल्हा व पीक निहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता (कंसात) पुढीलप्रमाणे. अहिल्यानगर जिल्हा- गहू (बागायत)- विमा संरक्षित रक्कम ४५ हजार रूपये (विमा हप्ता ४५० रुपये), रब्बी ज्वारी बागायत व जिरायत, हरभरा- ३६ हजार रुपये (३६० रुपये), पुणे जिल्हा- गहू (बागायत)- ४५ हजार रूपये (२२५ रुपये), रब्बी ज्वारी बागायत व जिरायत- ३६ हजार रुपये (१८० रुपये), हरभरा- ३६ हजार रुपये (९० रुपये) याप्रमाणे विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता राहील.
सोलापूर जिल्हा- गहू (बागायत)- विमा संरक्षित रक्कम ३८ हजार रूपये (विमा हप्ता ३८० रुपये), रब्बी ज्वारी बागायत – ३६ हजार रुपये (३६० रुपये), रब्बी ज्वारी जिरायत- ३० हजार रुपये (३०० रुपये), हरभरा- ३२ हजार ६७५ रुपये (३२६ रुपये ७५ पैसे) याप्रमाणे राहील.
रब्बी कांद्यासाठी तिन्ही जिल्ह्यांसाठी विमा संरक्षित रक्कम ९० हजार रुपये तर विमा हप्ता अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यासाठी ९०० रुपये आणि सोलापूर जिल्ह्यासाठी ४५० रुपये राहील. उन्हाळी भुईमूगासाठी तिन्ही जिल्ह्यांसाठी विमा संरक्षित रक्कम ४० हजार ६०० व विमा हप्ता १०१ रुपये ५० पैसे विमा हप्ता राहील.
अधिक माहितीसाठी १४४४७ या हेल्पलाईन क्रमांकावर अथवा भारतीय कृषी विमा कंपनी, स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा https://krishi.maharashtra.gov.in या संकेस्थळाला भेट द्यावी. शेतकऱ्यांनी विहित मुदतीमध्ये योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. गावसाने यांनी केले आहे.




