अमृततर्फे मोफत ड्रोनपायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी DGCA मान्यता प्राप्त प्रशिक्षणातून युवकांना नवे करिअर घडविण्याची संधी
B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड-अलिबाग,दि.07 : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) तर्फे मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करून युवकांना रोजगारक्षम बनविणे आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हे या उपक्रमामागचे प्रमुख उद्दिष्टआहे.
या अंतर्गत 10 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून उमेदवारांना नागरिक उड्डाण महासंचालनालय (डीजीसीए) मान्यता प्राप्त प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना अधिकृत दूरसंवेदन पायलट परवाना मिळणार असून, कृषी, सर्वेक्षण, छायाचित्रण, चित्रफितनिर्मिती, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, शेतीमध्ये फवारणी व तपासणी अशा विविध क्षेत्रांत रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या दिशा खुल्या होतील.
प्रशिक्षणामध्ये मध्यम वर्ग ड्रोन प्रशिक्षण, लघु वर्ग ड्रोन प्रशिक्षण, प्रशिक्षक प्रशिक्षण, कृषी क्षेत्रातील ड्रोन वापर, वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापनातील ड्रोन वापर, नकाशांकन व सर्वेक्षण, ड्रोन देखभाल आणि सेवा प्रशिक्षण तसेच छायाचित्रण व चलचित्र निर्मिती प्रशिक्षण अशा एकूण आठ प्रकारचे अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. प्रत्येक तुकडीत 15 विद्यार्थ्यांचा समावेश असेल. हे प्रशिक्षण रायगड पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि परभणी या केंद्रांवर आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर प्राथमिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील अशा समाजांना दिला जाणारआहे, ज्यांना कोणत्याही शासकीय महामंडळ किंवा संस्थेकडून समकक्ष योजना मिळत नाही. यामध्ये ब्राह्मण, मारवाडी, माहेश्वरी, गुजराती, सिंधी, राजपूत, कोमटी, पटेल, बंगाली, ठाकूर, पाटीदार आदी समाजांचा समावेश आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावेत, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण असावी.अर्जदारांनी ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र, फिटनेस दाखला तसेच शैक्षणिक पात्रतेचा पुरावा (शाळा सोडल्याचे दाखला किंवा प्रमाणपत्र) सादर करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in, या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावा. अर्जाची छापील प्रत सर्व कागदपत्रांसह स्वाक्षरीसह अमृतसंस्थेच्या अथर्व कॉम्प्लेक्स, नवगण कॉलेज रोड, बीड येथील जिल्हा कार्यालयात सादर करावी.
या संदर्भात अमृत संस्थेचे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश विनायक मराठे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मो. क्र.:९११२२२८७५९ तसेच उपव्यवस्थापक मंगेश भागुराम ढेबे मो. क्र.:८१४९५५२१४३ तसेच अमृतमित्र अश्विन अभय वाड मो. क्र.:९०११५४3६४५ यांच्याशी संपर्क साधावा.




