धार्मिक अल्पसंख्यांक बहुल शाळांना पायाभूत सोयी – सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना, 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती : अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील संस्थांनी १४ नोव्हेंबरपर्यंत विहीत नमून्यात अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांना पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी 10 लक्ष रुपये अनुदान दिले जाते. योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. शासन मान्याता प्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, नगरपालिका/नगरपरिषद शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अल्पसंख्यांक समाजाचे (मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी व ज्यू मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असावेत. अपंगाच्या शाळांमध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी शिकत असावेत. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने डाईस कोड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी इन्स्टिट्युट कोड तसेच अपंग शाळांनी लाईसन्स कोड देणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाणार आहे. ज्या मदरसांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे, अशा मदरशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा आदींनी परिपूर्णरित्या भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील नियोजन शाखेत दि. 14 नोव्हेंबरपर्यत सादर करावा. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत.
अधिक माहिती, अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही जिल्हा प्रशासनाव्दारे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 022 69403370/19 या क्रमांकावर संपर्क साधावा.




