बनावट खतांच्या साठ्यावर कृषी विभागाची धडक; टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांच्या उत्पादन, वितरण आणि विक्रीवर कृषी विभागाने कडाक्याची कारवाई केली. मोडनिंब येथील रेवणसिद्ध ऍग्रो एजन्सीच्या गोडाऊनमध्ये बनावट इफको आणि पी.पी.एल कंपनीच्या लोगो असलेल्या खतांच्या बॅगा सापडल्या. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले असून, पुरवठादार रामलिंग माळी आणि उत्पादक दीपक सस्ते यांच्यावर टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांच्या आदेशानुसार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दत्तात्रय गावसाने, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग आणि शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

सदर कारवाई ही पथक प्रमुख हरिदास हावळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर, सदस्य सचिव बाळू बागल, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सोलापूर, मोहीम अधिकारी अजय वगरे, जिल्हा कृषी अधिकारी सागर बारावकर, शरद गावडे, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), माढा, पथक सदस्य प्रविण झांबरे, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) मोहोळ, विलास मिस्किन, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) बार्शी, गणेश पाटील, कृषी विभाग, बार्शी यांनी केली. यावेळी ईफको कंपनीचे प्रतिनिधी रवींद्र मोरेही उपस्थित होते.

कारवाईदरम्यान, प्रो.प्रा. रेवण तनपुरे यांच्या रेवणसिद्ध ऍग्रो एजन्सीच्या गोडाऊनमध्ये १०:२६:२६ आणि १८:४६:०० (डीएपी) या खतांचा बनावट साठा आढळून आला. या खतांच्या बॅगांवर राष्ट्रीयकृत इफको आणि पी.पी.एल कंपनीचे लोगो लावलेले होते, परंतु त्या परवानगीशिवाय तयार केलेल्या होत्या. पुरवठादार रामलिंग माळी, बैरागवाडी आणि उत्पादक दीपक सस्ते, ढवळेवाडी, तालुका फलटण यांनी परवान्यानिशी उत्पादन, साठवणूक आणि विक्री न करता शासनाची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. यामुळे खत नियंत्रण आदेश १९८५ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे.

भरारी पथक प्रमुख हरिदास हावळे यांच्या आदेशानुसार शरद गावडे, कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), माढा यांनी टेंभुर्णी पोलिस स्टेशनला भेट देऊन ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी गुन्हा दाखल केला. पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये बनावट खतांच्या विक्रीबाबत जागरूकता वाढली असून, कृषी विभागाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या