सोलापूर येथे माजी सैनिक आउटरीच मेळाव्याचे 4 नोव्हेंबर रोजी आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दिनांक 31: बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप, खडकी (पुणे) येथून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व माजी सैनिक यांच्यासाठी माजी सैनिक आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी सोलापूर येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ०९ ते दुपारी ०४ वाजेपर्यंत जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात पार पडणार आहे.
कार्यक्रमाचा उद्देश माजी सैनिकांच्या संरक्षण पेन्शन, कागदपत्रांशी संबंधित तक्रारी, PCDA (P) मंजूरी प्राधिकरण, अभिलेख कार्यालय, पुणे व पेन्शन वितरण प्राधिकरण/बँक प्रतिनिधींच्या उपस्थितीत समस्यांचे निराकरण करणे हा आहे. या मेळाव्यात पेन्शन, नातेवाईकांचे दस्ताऐवजीकरण, SPARSH प्रणाली, ECHS कार्ड, बँकिंग व आधार कार्ड संबंधित अडचणी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय व डीपीडीओ यांच्याशी संवाद तसेच वैद्यकीय व दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
उपस्थित राहणाऱ्या माजी सैनिक, वीर नारी/वीर माता-पिता, विधवा पत्नी व त्यांच्या अवलंबितांनी पीपीओ, सुधारित पीपीओ, डिस्चार्ज बुक, पेन्शनबुक, अपडेट केलेले बँक पासबुक व संबंधित तक्रारीचे पत्रव्यवहार सोबत आणणे आवश्यक आहे. कार्यक्रमस्थळी अल्पोपहार व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोलापूर व शेजारील जिल्ह्यांतील बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप (खडकी, पुणे) तसेच इतर रेजिमेंट, भारतीय नौसेना व वायुसेनेमधून सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद देवदत्त तुंगार यांनी केले आहे.




