स्मारक, संदर्भग्रंथाने रा. सू. गवईंच्या कार्याचा गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाचे उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती, दि. 30 : रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे कार्य मार्गदर्शक ठरावेत, तसेच त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, यासाठी स्मारक आणि सर्वंकष वाटचालीचा दस्तावेज तयार करण्यासाठी संदर्भग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही प्रकल्पातून त्यांच्या कार्याचा गौरव राज्य शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
अमरावती येथे राज्य शासनाने उभारलेल्या दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकाचा उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. सरन्यायाधिश न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, ॲड. आशिष जयस्वाल, न्या. भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, चरणसिंग ठाकूर, चैनसूख संचेती, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, रा. सू. गवई यांच्या कार्यकर्तृत्वाचा सार्थ गौरव करणारे स्मारक उभे राहिले आहे. स्मारक उभे करताना याचा उपयोग विद्यापिठातील विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे. येत्या काळात याच परिसरात मोठे प्रेक्षागृह साकारल्या जाणार आहे. त्यामुळे हे स्मारक युवकांच्या जडणघडणीत निर्णायक भूमिका निभावेल. स्मारकामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेच्या उपयोगाने रा. सू. गवई यांची दृकश्राव्य भाषणे ऐकण्यास मिळणार आहेत. किऑक्स, डिजीटल वॉल, अशा अत्याधुनिक सोयीने स्मारक उभे राहिले आहे.
रा. सू. गवई यांचे जीवन हे अजातशत्रू होते. त्यांनी समाजाच्या समस्या सोडवून आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली. त्यामुळे त्यांची दीर्घ राजकीय वाटचाल महत्वाची ठरली आहे. राज्यपाल पद भूषविताना त्यांनी जैन आणि बौद्ध तिर्थस्थळे विकसित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच शैक्षणिक सुधारणांवर भर दिला. भारतीय संविधानाप्रति त्यांना नितांत आदर होता. त्यांनी संविधान बदलाबाबत केलेले ‘नख आणि दाताने विरोध करतो’ हे वाक्य अजरामर आहे. प्रत्येक प्रश्न हा संविधानाच्या माध्यमातून सोडविला जावू शकतो, अशी त्यांची धारणा होती, असेही फडणवीस यांनी सांगितले.
न्यायमुर्ती गवई म्हणाले, रा. सू. गवई यांचे स्मारक पूर्ण होणे ही एक स्वप्नपूर्ती आहे. स्मारकाची पायाभरणी ते उद्घाटन ही कामे गतीने करण्यात आली आहे. या वास्तूचा लाभ नागरिकांना होणार आहे. विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, हा दृष्टीकोन ठेवून स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकात जीवनपट दर्शविताना कल्पकता ठेवली आहे. त्यामुळे स्मारक हे सर्वांग सुंदर झाले आहे. समाजाने दिलेल्या आशिर्वादाने वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य घटकांचे प्रश्न सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नुकताच झुडपी जंगलाचा प्रश्न सोडविण्यात आला असून याचा असंख्य शाळा, महाविद्यालय, तसेच नागरिकांचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे बोलतांना म्हणाले, रा. सू. गवई यांचे व्यक्तिमत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून घडले आहे. त्यांच्या अंगी विनयशिलता, नम्रता आणि शालिनता होती. त्यांना भेटल्यानंतर ऊर्जा जाणवायची. त्यांनी चळवळ जीवंत ठेवण्याचे काम केले. त्याचमुळे त्यांची तळागाळातील नागरिकांशी नाळ जुळली. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर त्यांनी सभागृहात आवाज उठविलेला पाहिले आहे. दिक्षाभूमीसोबतच त्यांनी राज्यपाल म्हणून भूषविलेल्या राज्यातील तिर्थस्थळांचा विकास केला. तसेच शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल केला. सामाजिक न्यायाची योजना राबविण्यास सरकारला सूचना केल्यात. त्यामुळे त्यांचे स्मारक हे मानवतेच्या विचारांनी उभे राहिले असल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, येत्या कालावधीत रा. सू. गवई यांचे जन्मशताब्दी वर्ष येणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली. स्मारकाचे काम दर्जेदार झाले आहे. येत्या काळात स्मारकाच्या विस्तारासाठी निधी देण्यात येईल. पूर्णाकृती पुतळाही हुबेहुब साकारला गेला आहे. दादासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वांशी उत्तम समन्वय साधला. आमदार, खासदार, राज्यपाल म्हणून त्यांची राजकीय वाटचाल दीर्घकाळ राहिली. उत्कृष्ट वक्तृवाने त्यांनी नेतृत्व आणि कर्तृत्व घडविले असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
स्मारकाच्या कामात विशेष लक्ष देऊन बांधकाम उत्कृष्टरित्या केल्याबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याची सरन्यायाधिश भूषण गवई यांनी स्तुती केली. स्मारकाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच यावेळी कंत्राटदार नितीन गभने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी, वास्तूविषारद प्रशांत सातपुते, मुर्तीकार प्रज्ञानंद मूर्ती, पुरूषोत्तम पाटणकर, उमेश रोडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्मारकाच्या दर्शनी भागावरील दादासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी स्मारकाची पाहणी केली. कार्यक्रमात दादासाहेब गवई यांच्या जीवनावरील चित्रफित दाखविण्यात आली. तसेच स्मारकाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रास्ताविक केले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.
स्मारकाविषयी… केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल तसेच रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. (दादासाहेब) गवई यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकामध्ये ज्येष्ठ नेते दिवंगत रा. सू. (दादासाहेब) गवई यांचे जीवन कार्य दर्शवणारे स्मृतीसभागृह (म्युझियम) आणि अत्याधुनिक श्रोतगृह (ऑडिटोरियम) यांचा समावेश आहे. स्मारकाच्या दर्शनी भागावर दादासाहेबांचा १५ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच दादासाहेब गवई यांच्या जीवनाचा आणि कार्याचा प्रवास दर्शविणारे सभागृह तयार करण्यात आले आहे. या स्मारकासाठी 35 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
स्मारकाच्या दर्शनी भागात दादासाहेबांचा २.५ फूट उंचीचा ब्राँझचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांचा जीवनपट, दुर्मिळ छायाचित्रांसह, भिंतीवरील १६ डिजिटल पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदर्शित केला जाणार आहे. अभ्यागतांना त्यांच्या कार्याबद्दल सखोल माहिती मिळावी यासाठी दृकश्राव्य कियॉस्क आणि व्हीडीओ वॉलची सोय उपलब्ध आहे. यासोबतच स्मारकात स्मरणिका दालन देखील उभारण्यात आले आहे. तसेच स्मारकाच्या पहिल्या माळ्यावर २०० आसनी क्षमतेचे अद्ययावत श्रोतगृह तयार करण्यात आले आहे. याशिवाय श्रोतगृहाच्या तळ मजल्यावर अभ्यागतांसाठी आणि कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या सुविधा म्हणून एक सुसज्ज किचन आणि उपहारगृहाचा समावेश आहे.




