दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश , चार सराईत गुन्हेगार जेरबंद

0

गुन्हे शाखेची मोठी कामगिरी, सोलापूर पोलिसांच्या तपासातून आंतरजिल्हा घरफोडी टोळीचा उलगडा

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : शहर गुन्हे शाखेने दिवसा बंद घरात घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत चार सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण ₹1,19,000/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या देखरेखीखाली सपोनि विजय पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.

घरफोडीच्या सलग दोन घटना

२५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते संध्याकाळी ६.०० दरम्यान जुळे सोलापूर येथील गोविंदश्री मंगल कार्यालय परिसरात आणि कोणार्क नगर भागात दोन घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. बंद घरातील कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती. दोन्ही प्रकरणांवर विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते (गु.र.नं. ५११/२०२५ आणि ५१२/२०२५).

CCTV तपासातून आरोपींची ओळख पटली

गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून चार संशयितांची ओळख पटली. त्यानंतर खात्रीशीर माहितीच्या आधारे २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जुना पुणा नाका परिसरात छापा टाकून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

अटक केलेले आरोपी

शेरअली मोती सय्यद (२५) – रा. इंदिरा नगर, यवतमाळ

प्रसन्न प्रमोद मेश्राम (२४) – रा. डी.एड कॉलेज परिसर, यवतमाळ

चंदु हिरा भतकल (३९) – रा. मेघे टेकडी, वर्धा

रोशन पुरुषोत्तम प्रधान (२७) – रा. अंबिका नगर, यवतमाळ

    त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल व १५ हजार रोकड जप्त करण्यात आली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    आरोपींचा गुन्हेगारी इतिहास

    तपासात उघड झाले की हे चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये खून, दरोडा, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. प्रमुख आरोपी शेरअली सय्यद याच्यावर खुनाचा आणि मोक्का कायद्याखाली गुन्हा नोंद असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

    पोलिस दलाची संयुक्त कामगिरी

    ही कारवाई गुन्हे शाखेचे सपोनि विजय पाटील, पोलीस अंमलदार जावीद जमादार, महेश शिंदे, अनिल जाधव, धीरज सातपुते, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, राजू मुदगल तसेच सायबर पोलिस ठाण्याचे प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.

    About The Author

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या