ग्रामपंचायतीमुळेच शासनाच्या योजना खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात पोहोचतात – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे
रायगड जिल्हा परिषदेतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड-अलिबाग : केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम ग्रामपंचायतीमार्फत होते. ग्रामपंचायत नसेल तर कुठलीही योजना प्रभावीपणे अंमलात येऊ शकत नाही, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.
रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार आणि गुणगौरव समारंभ क्षत्रीय समाज सभागृह, कुरूळ येथे उत्साहात पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्श मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, “ग्रामसभा म्हटली की, गावकरी हजेरी लावतात, कारण त्यांना माहीत असते की, गावाच्या समस्या सोडविणारा खरा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामपंचायत आणि त्याचे शिल्पकार म्हणजे ग्रामसेवक. मोठ्या लोकसंख्येच्या गावात ग्रामसेवकाचे काम अधिक आव्हानात्मक असते. त्यामुळे आदर्श ग्रामसेवक म्हणून गौरव होणे,ही जबाबदारी अधिक वाढविणारी बाब आहे. यावेळी आमदार महेंद्र दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनीही आपल्या मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना “आदर्श ग्रामसेवक” पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने ग्रामसेवक उपस्थित होते. महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते वाडगाव येथे वन विभागामार्फत आयोजित माझे वन उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.




