आई प्रतिष्ठानतर्फे ३१० अनाथ मुलींना कपडे, फराळ आणि दिवाळी साहित्य वाटप , पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांची प्रमुख उपस्थिती
अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हसू
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : नवे कपडे, स्वादिष्ट फराळ आणि दिवाळी साहित्य मिळताच अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले. निमित्त होते आई प्रतिष्ठानतर्फे आई किंवा वडील तसेच आई आणि वडील दोन्ही नसलेल्या ३१० मुलींना दिवाळीनिमित्त कपडे, फराळ आणि दिवाळी साहित्य वाटपाचे.
कन्ना चौकातील चौडेश्वरी मंगल कार्यालयात गुरुवारी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते ३१० विद्यार्थिनींना कपडे, दिवाळी साहित्य आणि दिवाळी फराळ देण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक राजेंद्र काटवे, उद्योजक वैभव पाटील, चौडेश्वरी तोगटवीर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल बडगंची, पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, राहुल डांगरे उपस्थित होते.
प्रारंभी व्याहर्ती होम करण्यात आला. यानंतर श्री मार्कंडेय हायस्कूल, सिद्धेश्वर ज्युनिअर कॉलेज, सिद्धाराम म्हेत्रे प्रशाला, सोनामाता प्रशाला, भू.म. पुल्ली कन्या प्रशाला, कुचन प्रशाला या शाळांमधील मुलींना दिवाळीनिमित्त नवे कपडे, दिवाळी फराळ तसेच साबण, उटणे, पणत्या असे दिवाळी साहित्य देण्यात आले.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार म्हणाले, माता किंवा पिता पालक पालक नसलेल्या विद्यार्थिनींसाठी आई प्रतिष्ठानकडून करण्यात येणारा हा उपक्रम इतरांना प्रेरणा देणारा आहे. विद्यार्थिनींनी भीती, न्यूनगंड बाळगू नये. शिक्षणाकरिता सहाय्य करणाऱ्या अनेक संस्था, व्यक्ती समाजात तत्पर आहेत. तसेच शासनही विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थिनींनी चांगले शिकून जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त अशी पदे मिळवून शहराची पर्यायाने देशाची सेवा करावी, असेही पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक राजेंद्र काटवे म्हणाले, विद्यार्थिनींनी भरपूर शिकून प्रगती करावी. संस्कार मिळवून जीवनात यश मिळवावे. आई प्रतिष्ठानचे कार्य उत्कृष्ट असून अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होते, असेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक राजेंद्र काटवे यांनी सांगितले.
आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले. पंचाक्षरी स्वामी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. यावेळी अर्णव डांगरे, राहुल डांगरे, अविनाश शंकू, शुभम चिट्याल, लक्ष्मीकांत येलदी, अंबादास पोगुल, व्यंकटेश बंडा, उमेश चिट्याल आदी उपस्थित होते.




