रा. सू. गवई स्मारक उद्घाटनासाठी सज्ज, अमरावतीत उभे राहिले भव्य स्मारक जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अमरावती : रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात आले आहे. दादासाहेबांचा पुतळा, संग्रहालय आणि सभागृहाचे काम पूर्णत्वास आले असून हे भव्य स्मारक उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज स्मारकस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच स्मारकाबाबत महत्वपूर्ण सुचना केल्या.

दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन दि. 30 ऑक्टोबर रोजी नियोजित आहे. उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे.

उद्घाटनाच्या अनुषंगाने सर्व परवानगी आणि ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहेत. तसेच उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. स्मारक ठिकाणी वीज, पाणी आणि स्वच्छतेची कामे प्राधान्याने करण्यात आली आहेत. याबाबींचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. वीज वितरण सुरळीत सुरू राहावी, पाण्याचा पुरवठा व्यवस्थित राहावा, तसेच स्वच्छतेसाठी मनुष्यबळ नेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सुचनांचा आढावा घेण्यात आला. वीज जोडणी आणि त्याचे देयक, पाणी पुरवठा योग्य दाबाने होण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती घेण्यात आली. स्मारकाचे योग्य देखभाल होण्यासाठी याठिकाणी तीन व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून इमारत आणि परिसराची देखभाल करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून दादासाहेब गवई यांच्याबद्दल माहिती देण्यात येईल. महापालिकेने दोन पाळीमध्ये चार सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.

उद्घाटन समारंभाला महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने याठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करावे. तसेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यासाठी वाहनतळाची सुविधा करावी. कार्यक्रमाला न्यायिक अधिकारी उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यासाठी वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सुचना पोलिस विभागाला यावेळी देण्यात आल्या. दादासाहेब गवई यांचा जीवनपट येथे येणाऱ्या नागरिकांना कळावा, यासाठी चित्रफिती तयार करण्यात याव्यात. तसेच त्यांच्या उपयोगातील वस्तू याठिकाणी ठेवण्यात याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या.

भेटी दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, मुख्य अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या