महापालिकेतील रिक्त पदे शैक्षणिक पात्रतानुसार पदोन्नतीने भरावी, माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांची अतिरिक्त आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : महानगरपालिकेतील रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता व अनुभवाप्रमाणे पदोन्नतीने भरण्यात यावीत.या कामी सर्व खातेप्रमुखांकडून रिक्त पदांची माहिती व उच्च शिक्षित सेवकांची माहिती मागवुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी आज महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेत सरळसेवेने व पदोन्नतीने रिक्त पदावर नियुक्ती देण्यात येत आहे. परंतु सरळसेवेने परिक्षा घेवून नियुक्त केलेले सेवक (उमेदवार) हे एक तर नियुक्ती घेत नाहीत किंवा काही दिवस सेवा करुन राजीनामा देत आहेत. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. या व्यतिरिक्त अनेक विभागातील पदेच भरण्यात आलेली नाहीत. यामुळे या पदाच्या कामाचा अतिरिक्त भार इतर अधिकारी व कर्मचाऱ्यास सोसावा लागत आहे. अद्याप पर्यंत सेवानिवृत्त व कंत्राटी सेवकांकडुन मुदतवाढ देवून महत्वाच्या व जबाबदारीच्या पदावर बसविण्यात आल्याचे निदर्शनास येते.
अनेक सेवक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त व मयत होत आहेत. त्या ही जागा आजला रिक्तच आहेत व कांही सेवकाची पदोन्नती झाल्याने त्यांची मूळ पदही रिक्त होत आहेत. सोलापूर महानगरपालिका सेवा प्रवेश नियम 2022 मध्ये बऱ्याच पदांना सरळसेवेने नामनिर्देशनाने भरण्याची तरतुद केलेली आहे. परंतु सोलापूर महानगरपालिका ‘ड’ वर्ग महानगरपालिका असल्याने अथवा पगार, भत्ते कमी असल्याने सरळसेवेने निवडुन येणारे उमेदवार कामास इच्छुक नसल्याचे मागच्या भरतीवरुन स्पष्ट दिसुन येत आहे.
सोलापूर महापालिकेतील रिक्त पदे भरुन घेणे अत्यावश्यक आहे. आयुक्त यांच्या परिपत्रका अन्वये भरती नियमावलीमध्ये सरळसेवेने/नामनिर्देशन पदे भरण्याची अट शिथील करुन प्रथम प्राध्यान्य सोलापूर महापालिकेमध्ये कार्यरत स्थानिक उच्च शिक्षित सेवकांची पदोन्नतीने नियुक्ती करूनच उर्वरित पदभरती करण्यात यावी, असे आनंद चंदनशिवे यांनी निवेदनात म्हटले आहे.




