आंतरजातीय विवाह करणाऱ्या 70 लाभार्थ्यांच्या खात्यात 35 लक्ष जमा
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन आर्थिक सहाय्य योजना, प्रति जोडपे प्रत्येकी 50 हजाराचे अनुदान
B1न्यूज मराठी नेटवर्क
वर्धा, दि.16 : आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50 हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येते. सन 2025-26 वर्षात प्राप्त झालेल्या निधीमधून जिल्ह्यातील 70 लाभार्थ्यांना 35 लाख रुपयाचे अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर यांनी सांगितले.
आंतरजातीय विवाहितांना प्रोत्साहन देण्याची ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व भटक्या जमातीच्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौध्द, शीख या धर्मातील असल्यास अशा आंतरजातीय विवाहितास लागू आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्यांस प्रति जोडपे 50 हजार इतके अर्थसहाय्य देण्यात येते. अनुदान रक्कम वर वधु यांचे संयुक्त बँक खात्यात पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट जमा करण्यात येते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वर आणि वधू दोघांचेही जातीचे प्रमाणपत्र, डोमेसाईल, लिव्हींग सर्टीफिकेट, विवाह नोंदणी दाखला, आधारकार्ड आणि संयुक्त बँक खात्याचे पासबूक जिल्हा समाज कल्याण कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.




