पिसाळलेल्या लांडग्याचा शोध अद्याप सुरूच ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याचे वन विभागाचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील रातंजन परिसरात 10 व 11 ऑक्टोबर रोजी एका पिसाळलेल्या लांडग्याने काही ग्रामस्थांवर हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर वन विभागाने तत्काळ कारवाई करत परिसरात फिरती केली व ग्रामस्थांमध्ये जनजागृती अभियान राबविले.

वन परिमंडळ अधिकारी धनंजय शिदोडकर यांनी या जनजागृती मोहिमेदरम्यान माहिती दिली की, पिसाळलेला लांडगा काही दिवसात मृत्युमुखी पडतो. मात्र, अशा लांडग्याचा मृतदेह जर भटक्या कुत्र्यांनी किंवा तरसासारख्या मांसाहारी प्राण्यांनी खाल्ला, तर त्यांनाही पिसाळण्याची शक्यता असते. त्यामुळे लांडगा मृत आढळल्यास किंवा जिवंत आढळल्यास, त्याला हात न लावता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, 15 ऑक्टोबर रोजी पुणे येथील रेस्क्यू टीमचे सदस्य नचिकेत अवधानी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी शिदोडकर, सचिन पुरी (वनरक्षक, वैराग), बालाजी धुमाळ (वनरक्षक, पानगाव), परमेश्वर वाघमारे (वनरक्षक, चिंचोली), तसेच पोलीस पाटील श्री. मासाळ, जाधव व अनेक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने विस्तृत शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ड्रोनच्या सहाय्याने परिसराची तपासणी करण्यात आली.

परंतु, सखोल शोध घेतल्यानंतरही पिसाळलेल्या लांडग्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे लांडगा मृत अथवा जिवंत अवस्थेत अद्याप वन विभागाच्या ताब्यात आलेला नाही.

सदर मोहिमेचे नेतृत्व उपवनसंरक्षक कुलराज सिंग (सोलापूर), सहाय्यक वनसंरक्षक . अजित शिंदे व वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती अलका करे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वन विभागाच्या तत्परतेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या