वाचनातून मिळते प्रत्येकाला प्रेरणा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

0

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि.१५ : प्रत्येक व्यक्तिला यशस्वी होण्यासाठी वाचन खूप महत्त्वाचे आहे. वाचनातून सृजनशीलता, सहनशीलता व सकारात्मकता निर्माण होऊन नवी प्रेरणा मिळते, म्हणून प्रत्येकाने दररोज किमान एक तास वाचनासाठी द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. नियोजन सभागृहात डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकूणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन एकनाथ बंगाळे, व्याख्याते सुनील उबाळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विविध भाषा आणि धर्मांचे साहित्याचे वाचन प्रत्येकाने करावे. जीवन कल्याण हाच सर्व साहित्याचा सार आहे. माणसाला यशस्वी होण्यासाठी वाचन महत्त्वाचे असून यामधून मानवी मनाची जडणघडण होते. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्र शासनाने वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

कलाम यांच्या जीवनातील संशोधन कार्य हे देशासाठी मुलगामी आणि महत्वपूर्ण असून त्यांच्या साहित्यातून आणि जीवनकृतीतून सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी वाचनाबरोबरच त्यांचे जीवन कार्य पाहण्यासाठी त्यांच्या जन्म ठिकाणी तसेच कन्याकुमारी येथे भेट द्यावी असेही त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.

व्याख्याते सुनील उबाळे यांनी नारायण सुर्वे यांच्या साहित्य वाचनातून त्यांना खचून गेलेल्या मनाला नवीन उभारी घेऊन जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. ज्याप्रमाणे जगण्यासाठी भूक लागते, तसेच मेंदूची भूक भागवण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. दिवसभरात किमान स्वतःसाठी एक तास वाचनासाठी राखून ठेवून वाचन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्वतः च्या जीवनातील अनुभवातून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या