‘आपलं मंत्रालय’ अंकाचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रकाशन
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.
यावेळी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, उपसंचालक गोविंद अहंकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या अंकात मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः भेट दिलेल्या ठिकाणांचे अनुभव वर्णन, कविता, भरडधान्याचे आरोग्यदायी उपयोग, सुलेखन मालिका, कचरा व्यवस्थापन, ई-पेपर आदी विषयांवरील माहितीपूर्ण लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
ही गृहपत्रिका मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सर्जनशील लेखनाला व्यासपीठ उपलब्ध करून देत असून, शासनाच्या कार्यप्रणालीसोबतच सामाजिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक जागरूकतेलाही चालना देणारी ठरत आहे.




