सीसीटीव्हीने दिला पुरावा, बार्शी पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला छडा
कर्तव्यदक्षता, तत्पर तपास आणि जबाबदार कार्यपद्धतीमुळे बार्शी पोलिसांचे कौतुक…
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली दक्षता आणि तात्काळ कार्यक्षमता सिद्ध केली आहे. बेदराई विहिरीजवळ फोन लावायच्या बहाण्याने विद्यार्थ्याने पळवलेला मोबाईल पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून काढत मूळ मालकाच्या ताब्यात दिला आहे. या वेगवान आणि अचूक कारवाईमुळे नागरिकांच्या पोलिसांवरील विश्वासात अधिक भर पडली आहे.
नागेश रमेश पतंगे (राहणार, बारंगुळे प्लॉट, बार्शी) यांच्याकडे एका अनोळखी विद्यार्थ्याने “फोन लावायचा आहे” असा बहाणा करून मोबाईल मागितला. मात्र, मोबाईल घेताच तो विद्यार्थी घटनास्थळावरून पळून गेला. धक्कादायक घटनेनंतर नागेश पतंगे यांनी तात्काळ बार्शी पोलिसांशी संपर्क साधला.
ही बाब समजताच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने तपासाची दिशा ठरवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल माने आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काळजीपूर्वक तपासले. सिस्टीमॅटिक तपास व बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्यांनी आरोपीचा मागोवा घेत अखेर मोबाईल परत मिळवण्यात यश मिळवले.
या उल्लेखनीय कामगिरीनंतर मोबाईल मालक नागेश पतंगे यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले. त्यांनी सदर विद्यार्थ्यांविरुद्ध कोणतीही तक्रार नोंदवायची नसल्याचे पोलिसांना कळवले असून, या घटनेचा सौहार्दपूर्ण शेवट झाला आहे.
बार्शी पोलिसांची ही कृती केवळ कर्तव्यदक्षतेचे उदाहरण नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच सज्ज असलेल्या जनतेच्या पोलीस दलाचे सजीव दर्शन आहे. नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करत “पोलिसांच्या तत्परतेमुळे आपली सुरक्षितता अधिक दृढ वाटते” अशी प्रतिक्रिया दिली आहे.




