भेसळ आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी – अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे
परभणी जिल्ह्यात दुध भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम , १३ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष तपासणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी : दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी शासन निर्णय क्र. एमएलके-2023/प्र.क्र.62/पदुम-8, दिनांक 28 जून 2023 अन्वये गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक आज अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीस समिती सदस्य सचिव शिवाजी गिनगीने (जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी), खताळ (सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन), केशव सांगळे (उपआयुक्त, पशुसंवर्धन), गंगाधर कांबळे (उपनियंत्रक, वैधमापन) व यु.एस. गुंडरे (दुसंप) उपस्थित होते.
आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दुध, खवा व त्यापासून बनविलेल्या मिठाईंचा वापर वाढणार असल्याने संभाव्य भेसळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी १३ ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. भेसळ आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
जिल्हास्तरीय समितीने जनतेस आवाहन केले आहे की, दुध किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास तत्काळ तक्रार टोल फ्री क्रमांक ७०२८९७५००१ / ९०४९५१८७११ वर नोंदवावी.




