प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांचे ज्ञानसाहित्य जतन व्हावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अमरावती, दि. 11 : प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज यांनी विस्तृत साहित्य विवेचन केलेले आहे. त्यांनी 130 पुस्तकाच्या माध्यमातून समाजाच्या विविध भागावर सूक्ष्म पद्धतीने प्रकाश टाकला आहे. त्यांचे ज्ञान हे नवीन पिढीसाठी उपयुक्त ठरणार असल्याने तंत्रज्ञानाचा उपयोग करून जतन करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

माधान, ता चांदूरबाजार येथे समदृष्टी, क्षमताविकास आणि संशोधन मंडळ आणि श्री संत गुलाबराव महाराज संस्थान तर्फे दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संत गुलाबराव महाराज यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख, सक्षमचे अध्यक्ष विजयसिंह मोहता, संत गुलाबराव महाराज संस्थानचे अध्यक्ष अरविंद मोहोड, सचिव साहेबराव मोहोड, जयप्रकाश गिल्डा आदी उपस्थित होते.

मंत्री गडकरी म्हणाले, बालपणापासून अंध असलेल्या संत गुलाबराव महाराजांनी जगाला आश्चर्यचकित करेल अशी साहित्य निर्मिती केली आहे. जन्माने अंध असले तरी त्यांनी कोणतीही अडचणीवर मात करीत आत्मविश्वासाने उच्च दर्जाची साहित्य निर्मिती केली. त्यांच्या साहित्य निर्मितीमुळे माधान ही संदेश देणारी भूमी झाली आहे. त्यांच्या जीवनातून अडचणींवर मात करून समाजासाठी ज्ञानाचे भांडार निर्माण होते हे सिद्ध केले आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. आज ज्ञानेश्वरीने ज्ञानाचे भांडार आणि अभ्यासक निर्माण केले आहे. त्याच प्रकारचे अभ्यासक निर्माण करण्याची क्षमता प्रज्ञाचक्षुच्या ज्ञानात निर्माण झाली आहे. समाजाची भौतिक प्रगती होणे आवश्यक आहे.

पण समाज स्वस्थपणे जगण्यासाठी दिशा देण्याचे कार्य ज्ञानामध्ये आहे. यासाठी संतांनी दिलेले ज्ञान जतन करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे ज्ञान जपले पाहिजे. ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञानाचे परिवर्तन झाल्यास यातून समृद्धी निर्माण होते. चांदूरबाजार आणि परिसरामध्ये संत्र्याच्या उत्पन्नातही स्पेन आणि इजराइलच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे.

ज्ञानाचा उपयोग परिवर्तनामुळे कशा पद्धतीने शक्य झाले आहे, याचे उदाहरण यातून दिसून आलेले आहे. त्यामुळे प्रज्ञाचक्षूंच्या 130 पुस्तकांचे जतन संस्थांनकडून व्हावे. यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग करावा. नवीन तंत्रज्ञानाने त्यांचे ज्ञान पिढ्यानपिढ्या समाज प्रबोधनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीला गडकरी यांनी चांदूरबाजार येथील संत श्री गुलाबराव महाराज संस्थानाला भेट देऊन दर्शन घेतले. संस्थांच्या वतीने गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच त्यांच्या हस्ते पहिला ज्ञानेशकन्या पुरस्कार अमरावती येथील दृष्टीबाधित संघाला प्रदान करण्यात आला. सक्षम च्यावतीने दिव्यांग बांधवांना दृष्टीकाठीचे वाटप करण्यात आले. सक्षमच्या दुसऱ्या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या