बार्शी तालुक्यात अतिवृष्टीने वाहून गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर

0

पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार….

B1न्यूज मराठी नेटवर्क

काटेगाव येथील पुलाच्या नळकांड्या वाहून गेलेल्या होत्या, त्या पुन्हा नव्याने टाकून रस्ता वाहतुकीस सुरू केला

सोलापूर, दि. 7 : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे, घरांचे तसेच रस्त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते पूल वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला होता. त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची पाहणी करून नादुरुस्त रस्ते, पुल तात्काळ दुरुस्त करून गावोगावीची दळणवळण व्यवस्था सुरळीत करण्याबाबत निर्देशित केलेले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त रस्त्यांची माहिती घेऊन ते रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची कार्यवाही जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे.
अतिवृष्टीमुळे बार्शी तालुक्यातील अनेक भागांतील रस्ते, मो-या व पुलांचे पोहचमार्ग नुकसानग्रस्त झाले असून काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला व रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

पाऊस ओसरताच सार्वजनिक बांधकाम विभाग तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आला. सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार व कार्यकारी अभियंता अ. बा. भोसले यांनी बार्शी तालुक्यातील पूरग्रस्त व क्षतिग्रस्त रस्त्यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार उपअभियंता विक्रांत चव्हाण, उपअभियंता आकाश नलावडे तसेच सर्व कनिष्ठ अभियंते व विभागीय कर्मचारी यांनी मिळून युद्धपातळीवर रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली आहे. तात्पुरत्या स्वरूपात मुरूम भरावा, पोहचमार्ग दुरुस्ती व पाण्याचा निचरा करण्याची कामे वेगाने सुरू असून नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ वाहतुकीसाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

काटेगाव चारे पाथरी पांगरी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 29 रस्त्या वरील काटेगाव येथील नळकांडी पूल अतिवृष्टी मुळे पुर्णता वाहून गेला होता त्याठिकाणी नळकांड्या व मुरूम भरावा करून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. आज दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व महत्त्वाच्या मार्गांवरील पोहचमार्गांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली असून बार्शी तालुक्यातील प्रमुख गावांदरम्यान वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी रस्ते वाहतुकीचा सुरळीत प्रवाह लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मेहनत घेत आहेत. सर्व कामे सुरक्षा व तांत्रिक नियमांचे काटेकोर पालन करून केली जात आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या